For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर एमपीएने कुंपण उभारल्याने तणाव

12:59 PM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर एमपीएने कुंपण उभारल्याने तणाव
Advertisement

वास्को : मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाचे आणि या महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाण पुलांचेही केंद्रीयमत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री लोकार्पण केल्याने जनतेमध्ये समाधान पसरलेले असतानाच या महामार्गाच्या प्रश्नावरून काल बुधवारी वादाची ठिणगी पडली. महामार्गाचे बायणातील जोड रस्ते एमपीएने कुंपण व गेट उभारून बंद केल्याने मुरगाव पालिका मंडळासह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. हे कुंपण आठ दिवसांच्या हात हटवावे, लोकांनाही हा रस्ता खुला करावा, अन्यथा आम्ही हटवू असा इशारा नगरसेवक व नागरिकांनी दिला आहे. बायणातील रवींद्र भवनकडून उड्डाण पुलाद्वारे चौपदरी महामार्ग मुरगाव बंदराच्या गेट क्रमांक नऊ जोडण्यात आलेला आहे.

Advertisement

त्यामुळे महामार्ग मुरगाव बंदराला जोडण्याची अनेक वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झालेली आहे. मुरगाव बंदरातील मालवाहतुकीसाठी व अन्य अवजड वाहतुकीसाठीही या पुलामुळे स्वतंत्र सोय झालेली आहे. बंदराला जोडण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा नव्वद टक्के भाग एमपीएच्या क्षेत्रातच आहे. एमपीएच्या बायणातील रेल्वे यार्डमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन उड्डाणपुल मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाला जोडण्यात आलेले आहेत. तसेच वास्को शहरही या महामार्गाला उड्डाण पुलाव्दारे जोडण्यात आलेले आहे. मात्र, जमिनीअभावी केवळ वास्को शहरातून बाहेर पडण्यासाठीच हा उड्डाण पुल तयार करण्यात आलेला आहे. या तीन जोड पुलांपैकी बायणा यार्डातील दोन पुलांचे येण्या जाण्याचे मार्ग एमपीएने कुंपण व गेट उभारून बाहेरच्या वाहतुकीसाठी बंद केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कुंपणाचे काम चाललेले होते. त्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती.

नगरसेवक व लोकांमध्ये तीव्र नाराजी

Advertisement

काल बुधवारी सकाळी या वादाने तोंड उघडले. स्थानिक नगरसेवक दीपक नाईक व स्थानिक नागरिकांनी ते कुंपण व त्या गेटचा विषय मुरगावच्या नगराध्यक्षांच्या कानावर घातला. त्यामुळे नगराध्यक्ष व काही नगरसेवक घटनास्थळ दाखल झाले. यावेळी काही समाजसेवकही उपस्थित होते. त्यांनी एमपीएने कुंपण व गेट उभारून रस्ते बंद करण्याच्या कृतीचा निषेध केला. नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी यासंबंधी एमपीएच्या अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न पेला. मात्र, नगराध्यक्षांना त्या अभियंत्याकडून अपमान सहन करावा लागला. त्यांना उडवाउडवीची उत्तरे ऐकावी लागली अशी माहिती नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिली. या प्रकाराचाही नगरसेवकांनी निषेध केला. नगराध्यक्ष, नगरसेवक व स्थानिक लोकांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार एमपीएची कृती पूर्णपणे चुकीची आहे. मुरगाव बंदरासाठी रस्ता तयार व्हावा यासाठी स्थानिक लोकांनी अनेक प्रकारे त्रास सहन केलेला आहे व रस्ता तसेच पुल तयार व्हावेत यासाठी पूर्ण सहकार्यही केलेले आहे. त्यामुळे आता अन्याय सहन केला जाणार नाही. आमदार दाजी साळकर यांनी दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत यासंबंधी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी म्हटले आहे.एमपीएने कुंपण व गेट हटवावे, अन्यथा आम्हालाचे ते हटवावे लागेल असे नगरसेवक व स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक दीपक नाईक, रामचंद्र कामत, माजी नगराध्यक्ष दामू कासकर, लियो रॉड्रिक्स, नगरसेवक प्रजय मयेकर यावेळी उपस्थित होते.

आमदार आमोणकर यांनी वेधले लक्ष

दरम्यान, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएच्या कुंपणाचा विषय मंगळवारी रात्री पार पडलेल्या महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात मांडला होता. एमपीएच्या अध्यक्षांचे त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. वास्को शहरात महामार्गावर चढण्यासाठी उड्डाण पुलाची सोय करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे सामान्य वाहतुकीला महामार्गावरून खाली उतरण्यासाठी बायणातील रस्ता खुला ठेवावा. तो रस्ता बंद करण्यात येऊ नये अशी मागणी एमपीएच्या अध्यक्षांकडे केली होती. आमदार आमोणकर लोकांची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तानावडे यांची केबल स्टेड पुलाला भेट

काल बुधवारी संध्याकाळी खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही मुरगाव बंदराला जोडलेल्या केबल स्टेड पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार संकल्प आमोणकर, मानव संसाधन विकास महामंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक दीपक नाईक, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगांवकर आदी उपस्थित होते. एमपीएच्या कुंपणाचा प्रश्न काहींनी त्यांच्यासमोर मांडला. या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Advertisement
Tags :

.