बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी जानेवारीत निविदा
केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांची माहिती : जिल्ह्यातील 600 एकर जागेचे होणार संपादन
बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वेमार्गासाठी जानेवारी 2025 मध्ये निविदा मागविल्या जाणार आहेत. तर पुढील 18 ते 20 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होऊन बेळगाव-धारवाड रेल्वेप्रवास जलदगतीने होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बेळगाव-धारवाड नव्या रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. नव्या रेल्वेमार्गासाठी एकूण 888 एकर जागेचे संपादन केले जाणार आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 600 एकर तर धारवाड जिल्ह्यातील 288 एकर जागा संपादित केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील जागा रेल्वे विभागाला हस्तांतरित करण्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी यापूर्वी 927 कोटी रुपये मंजूर झाले होते. परंतु सध्या यामध्ये वाढ करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धारवाडच्या करेकोप येथून बेळगावच्या देसूर रेल्वेस्थानकाला नव्या रेल्वेमार्गाद्वारे जोडले जाणार आहे. एकूण 73 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग निर्माण केला जाणार आहे. यामध्ये 6 ठिकाणी रोड ओव्हरब्रिज व रोड अंडरब्रिज होणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यावेळी बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील जमीन संपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 80 टक्के जागा संपादित करण्याचे काम पूर्ण होईल. जानेवारी 2025 पर्यंत बेळगावमधील आवश्यक जागा रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हर्ष खरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
टिळकवाडी-अनगोळ येथे होणार ओव्हरब्रिज
मागील काही दिवसांपासून टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट व अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे नैर्त्रुत्य रेल्वेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. याला आता खुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे. या दोन ओव्हरब्रिजबरोबरच पहिले रेल्वेगेट येथे फूट ओव्हरब्रिज केला जाणार आहे. तसेच बेंगळूर-बेळगाव दरम्यान नवी वंदेभारत सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री सोमण्णा यांनी दिली.