For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हेगारी रोखण्यासाठी भाडेकरू पडताळणी मोहीम

06:44 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुन्हेगारी रोखण्यासाठी भाडेकरू पडताळणी मोहीम
Advertisement

नऊ महिन्यांत 40 हजार भाडेकरूंची पडताळणी : उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उत्तर गोव्यात विशेष भाडेकऊ पडताळणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या नऊ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते 28 सप्टेंबरपर्यंत भाडेकऊ आणि घरात काम करणाऱ्या कामगारांची मिळून सुमारे 40 हजार जणांची पडताळणी केली असल्याची माहिती उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे. परप्रांतीयांची कसून तपासणी करण्यासाठी प्रमुख बाजारपेठेमध्ये शिबिरे लावण्यात आली. उशिरापर्यंत फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांवर लक्ष ठेवून सार्वजनिक सुरक्षा वाढवली आहे. बेकायदेशीर कृत्यांना  प्रतिबंध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही अक्षत कौशल म्हणाले.

Advertisement

गोव्यात कामानिमित्त मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येतात आणि भाड्याने राहतात. एखादे गुन्हेगारी प्रकरण घडले की परस्पर पोबारा करतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. राज्यात घडलेल्या गुन्हेगारी प्रकरणात अधिकाधिक परप्रांतीय असल्याचे आत्तापर्यंत आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची सखोल माहिती आणि त्यांची पार्श्वभूमी पोलिसांकडे असणे फार महत्त्वाचे आहे म्हणूनच ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे अक्षत कौशल म्हणाले.

उत्तर गोव्यातील सर्व पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरकाम करणाऱ्या कामगारांची पडताळणी करणे सुरू करण्यात आले असून लोकांनी त्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान उत्तर गोवा पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रमुख ठिकाणी विशेष शिबिरे लावली होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा या शिबिरामागील हेतू आहे. भाडेकरू, कामगार आणि घरातील मदतनीस यांची 100 टक्के पोलीस पडताळणी होत असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खात्री केली जाते.

आतापर्यंत 27 हजार 718 भाडेकऊंची पडताळणी

दर आठवड्याला नवनवीन ठिकाणी तपासणी करण्याचे नियोजन केले जाते. या वर्षात 28 सप्टेंबरपर्यंत 27 हजार 718 भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच घरात काम करण्यासाठी ठेवलेल्या 11 हजार 68 परप्रांतीयांची पडताळणी केली गेली आहे. पडताळणी प्रक्रियेमध्ये विविध निकषांची पूर्तता झाली आहे की नाही हे तपासणे समाविष्ट आहे. घरमालकाने भाड्याने दिलेली जाग योग्य कामासाठी दिली आहे की नाही तसेच ज्या व्यक्तीला जागा भाड्याने दिली आहे त्याची माहिती संबंधित पोलीस स्थानकाला दिली की नाही त्याची तपासणी केली जाते.

‘ऑपरेशन राखण’

पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन राखण’ सुरू केले आहे. रात्रीच्यावेळी गुन्हेगारी रोखण्यासाठी उशिरापर्यंत फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करतात. कोणतेही संशयास्पद कृत्य होत अल्याचे आढळल्यास किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास योग्य कारवाई केली जाते. या उपक्रमाद्वारे, राज्याला गुन्हेगारीमुक्त करणे आणि जनतेची सेवा वाढवणे हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. सुरक्षितता आणि लोकांच्या मनता आत्मविश्वासाची भावना निर्माण करणे गरजेचे आहे.

उत्तर गोव्यातील या भागात राबविली मोहीम

बिठ्ठोणा-पर्वरी, हणजूण-शिवोली, पणजी मार्केट परिसर, वाळपई मार्केट परिसर, बोडकेवाडा कळंगुट, पालये, मांद्रे, डिचोली मार्केट परिसर, धारगळ पेडणे, कुंभारजुवा खोर्ली, ओल्ड गोवा, वयलेभाट साळगाव, सडये शिवोली, म्हापसा, मोपा विमानतळ कामगार वस्ती, पत्रादेवी, थिवी कामुर्ली- पिर्ण कोलवाळ व बांबोळी आगशी.

Advertisement
Tags :

.