चोडणकर यांचे मुख्यमंत्री, वनमंत्र्यांवर गंभीर आरोप
युवा काँग्रेसची सदस्यता नोंदणी मोहीम
प्रतिनिधी/ पणजी
गोवा संपविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वनमंत्री विश्वजित राणे यांच्यात जशी काही तीव्र स्पर्धाच सुरू झाली आहे. हे प्रकार असेच चालू राहिल्यास पुढील निवडणुकीपर्यंत कित्येक लाखो चौरस मिटर जमीन बिगरगोमंतकीय बड्या प्रस्थांच्या घशात जाईल, अशी भीती काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे गोव्याचा विनाश करण्यास सरसावलेले सदर दोघेही मंत्री व एकुणच भाजपपासून गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी अमरनाथ पणजीकर, अर्चित नाईक आणि जॉन नाझारेथ यांची उपस्थिती होती. विश्वजित राणे यांची कार्यपद्धती पाहता राज्यातील जमिनी म्हणजे वैयक्तिक मालमत्ता किंवा ‘हुंडा’ म्हणून मिळाल्याच्या थाटात विकत आहेत, असा आरोप चोडणकर यांनी केला.
अशा प्रकरणात स्वत:चा हात नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी कितीही अलिप्त राहण्याचे प्रयत्न केले तरी त्यांचा सहभाग किंवा सहमताशिवाय हा भ्रष्टाचार होऊच शकत नाही. तसे नसेल तर झुआरीच्या ताब्यात असलेल्या वनजमिनीच्या झोन बदलाबाबत सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान चोडणकर यांनी केले.
युवा काँग्रेसची 2 ऑक्टोबरपासून सदस्यता नोंदणी मोहीम
दरम्यान, युवा काँग्रेसतर्फे राज्यात सदस्यता मोहीम राबविण्यात येणार आहे. गांधी जयंतीदिनी 2 ऑक्टोबरपासून ही मोहीम प्रारंभ होणार असून युवा काँग्रेसचे पदाधिकारी प्रत्येक मतदारसंघात पंचायतस्तरावर घरोघरी जाऊन युवकांना सदस्य बनण्यासाठी प्रोत्सहित करणार आहेत, यात 18 ते 35 वयोगटातील युवावर्गावर खास भर देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.