शेडेगाळी येथील दहा ट्रॉली गवत जळून खाक
खानापूर : तालुक्यातील शेडेगाळी येथील शेतकऱ्यांचे दहा ट्रॉली गवत शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भर दुपारी आग लागल्याने आग आटोक्यात आली नसल्याने एकमेकाशी शेजारी लागून दहा गवत गंज्या जळून खाक झाल्या आहेत. शेडेगाळी येथील शेतकरी गणपती गुरव, पुंडलिक चव्हाण, मष्णू गुरव, जोतिबा घाडी, जोतिबा चव्हाण, तुकाराम चव्हाण, व्यंकाप्पा गुरव, मारुती चव्हाण,रवळू गुरव या शेतकऱ्यांनी भात मळणी करुन गावालगतच असलेल्या जागेवर एकमेकाशेजारी गवत गंज्या लावून ठेवल्या होत्या. शुक्रवारी दुपारी अचानक एका गवंत गंजीला आग लागली. गवत गंज्या एकमेकाशी लागून असल्याने सर्वच गवत गंज्याना आग लागली. त्यामुळे प्रचंड आगीचा लोळ तयार झाल्याने नागरिकांना आग विझविणे अशक्य झाले. याबाबची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. आग विझविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र एकाचवेळी दहा गवत गंज्याना आग लागल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. सर्व दहा गवत गंज्या जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती माजी आमदार अरविंद पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घटनेचा पंचनामा करुन नुकसानभरपाई देण्याची सूचना केली.