मणिपूरच्या चंदेलमध्ये दहा दहशतवादी ठार
चार जिल्ह्यांमध्ये सात दहशतवाद्यांना अटक : भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सची शोधमोहीम
वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात गुरुवारी आसाम रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सकडून शोधमोहीम सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली. 14 मे रोजी न्यू समताल गावाजवळ दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर आसाम रायफल्स युनिटने शोध मोहीम राबवत दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे लष्कराच्या पूर्व कमांडने सांगितले. सुरक्षा दलाने राबविलेल्या शोधमोहिमेवेळी दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 10 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे.
13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट
मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे, परंतु विद्यमान विधानसभा विसर्जित झालेली नाही. येथील अनेक नागरी संघटनांनी याच्याविरोधात आंदोलन केले आहे. 30 एप्रिल रोजी 21 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यात त्वरित लोकप्रिय सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. भाजपच्या 14 आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे.