मॉक ड्रिलच्या माध्यमातून दहा जणांची सुटका
वार्ताहर/विजापूर
जिह्यातील आलमट्टी जलाशयावर घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मॉक ड्रिलमध्ये लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या धैर्य आणि शौर्यामुळे दहशतवाद्यांना यशस्वीपणे पराभूत करण्यात आले. त्यांनी दहशतवाद्यांकडून बंदिवान बनवलेल्या 10 नागरिकांची सुरक्षित सुटका केली. या रोमांचक मॉक ड्रिलच्या प्रात्यक्षिकामुळे उपस्थित नागरिक थक्क झाले. तर लष्कराच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक झाले. नागरिकांमध्ये सुरक्षा भावनेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा मॉक ड्रिल यशस्वी ठरला. आज आलमट्टीतील लालबहाद्दूर जलाशयावर आयोजित केलेल्या नागरी संरक्षण मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळवण्याचे लष्करी ऑपरेशन सादर करण्यात आले.
मॉक ड्रिलमध्ये पहिल्यांदा दोन वाहनांद्वारे (व्ही 1 आणि व्ही 2) दहशतवादी जलाशयाच्या मुख्य गेटमार्गे प्रवेश करतात आणि तिकीट काउंटर-2 वर नागरिकांवर हल्ला करतात. चेकपॉईंटवर झालेल्या हल्ल्यात केएसएफएएसएफचे दोन सुरक्षा कर्मचारी मृत्युमुखी पडतात आणि एक जखमी होतो. जखमी जवान नियंत्रण कक्षाला माहिती देतो आणि लगेचच सायरन वाजतो. ही माहिती दोन्ही जिह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स (विजापूर व बागलकोट) आणि केबीजेएनएल अधिकाऱ्यांना दिली जाते. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना प्रवेशबंदीच्या सूचना पाठवण्यात येतात. त्यानंतर दहशतवादी वाहनांमधून अणेकट्टाच्या दिशेने जातात. इ-1 ते इ-3 दहशतवादी बंधाऱ्याजवळील खडकांमध्ये लपतात. उद्यानातून हॉटेलच्या दिशेने जाऊन ते सुमारे 10 नागरिकांना ओलीस धरतात. जी-2 वर्तुळात स्थलांतरित होऊन गेट 1 वर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार होतो. जी-2 मधून आलेल्या सर्व दहशतवाद्यांना केएसएफएएसएफ निष्प्रभ करते.