रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दहा दिवसांचा अल्टीमेटम
तालुका म. ए. समितीचे सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन : तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसांत तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा अल्टीमेटम तालुका म. ए. समितीने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे दिला आहे. त्यानंतरही दुरुस्ती न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद यांना रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधकाम खात्याला निवेदन दिले. मे व जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोड, उचगाव-बेकिनकेरे, मच्छे-संतिबस्तवाड, मच्छे-वाघवडे, त्याचबरोबर तालुक्यातील इतर भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे.
बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने भरीव निधी मंजूर केला असून पावसाळा संपताच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदनाची दखल घेऊन तात्काळ साहाय्यक कार्यकारी अभियंता सोबरद यांनी कंत्राटदारांना फोन लावला. तालुक्यातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती येत्या आठवडाभरात करावी, अशी सूचना कंत्राटदाराला करण्यात आली. त्यामुळे म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
23 ऑगस्टपूर्वी तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी अॅड. एम. जी. पाटील, युवानेते आर. एम. चौगुले, एल. एस. होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, नारायण सांगावकर, कमल मन्नोळकर, अंकुश पाटील, अनिल हेगडे यांसह तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.