चिपळुणात 'स्मार्ट मीटर' ला तात्पुरती स्थगिती
चिपळूण :
स्मार्ट वीज मीटर बसवण्यास नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही ते बसवले जात असल्याच्या विरोधात सोमवारी महाविकास आघाडीने महावितरण कार्यालयावर धडक दिली. संतप्त पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर अखेर तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्यास तात्पुरत्या स्वरुपाची स्थगिती देत असल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता धनंजय भांबरे यांनी दिले.
स्मार्ट मीटरला होत असलेला विरोध तसेच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा याबाबत सोमवारी महाविकास आघाडीने महावितरणवर धडक दिली. यावेळी भांबरे यांना निवेदन देत स्मार्ट मीटरची सक्ती का असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काही दिवसांपूर्वी महावितरणने चिपळूण नगरपरिषदेचे येणे थकीत असल्याचे कारण देऊन शहरातील 33/11 के. व्ही. उपकेंद्राचा वीज पुरवठा अचानक खंडित केल्याने संपूर्ण शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप झाला. याविषयीही संतप्त पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत दोन शासकीय यंत्रणांतील वादाचा नाहक त्रास यापुढे सामान्य नागरिकांना होता कामा नये, असा इशाराही दिला.
वेळेवर वीजबिल न मिळणे, चुकीचे बिलिंग, ग्राहक सेवा केंद्रातील दिरंगाई, तांत्रिक बिघाड दुरुस्तीस लागणारा वेळ हे मुद्दे नागरिकांच्या त्रासात भर घालत असून त्यावर तत्काळ ठोस उपाययोजना का आखल्या जात नाहीत, या प्रश्नावर जिथे-जिथे ग्राहकांच्या तक्रारी असतील त्या तत्काळ सोडवल्या जातील, अशी ग्वाही देताना नागरिकांचा स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध असल्याने तालुक्यात यापुढे हे मीटर बसवण्यास तात्पुरत्या स्वरुपाची स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या तक्रारी आपण थेट वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, असे न झाल्यास पुढे महाविकास आघाडीकडून थेट महावितरण विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी शरद पवार राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, ठाकरे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद आडरेकर, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, तालुकाध्यक्षा निर्मळा जाधव, सचिन शेट्यो, इम्तियाज कडू, यशवंत फके, अजित गुजर, रफिक मोडक, सचिन चोगळे, माजी नगरसेविका सफा गोठे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.