मुख्यमंत्रिपदाच्या वादाला तात्पुरता ‘ब्रेक’
मतभेद नसल्याचे सिद्धरामय्या-शिवकुमार यांचे स्पष्टीकरण : : आज दिल्लीत सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या वादाला तात्पुरता ‘ब्रेक’ लागला आहे. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी ‘ब्रेक फास्ट मिटींग’ झाली. यावेळी गेल्या दीड महिन्यांपासून काँग्रेस गोटात मुख्यमंत्री बदलावरून निर्माण झालेला गोंधळ सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चर्चेद्वारे मिटविला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही दोघेही एकत्र आहोत. अधिकार हस्तांतराविषयी हायकमांडच्या निर्णयाशी आम्ही कटिबद्ध राहणार आहे, असे उभय नेत्यांनी सांगितले आहे. रविवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असून या बैठकीसाठी सिद्धरामय्या व शिवकुमार यांना अद्याप दिल्लीभेटीचे निमंत्रण मिळालेले नाही. मात्र, तशी शक्यता अधिक असून तेथेच हायकमांडचा निर्णय कळविण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेस हायकमांडच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले बेंगळुरातील शासकीय ‘कावेरी’ येथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बोलावून चर्चा केली. त्यासाठी शुक्रवारी रात्रीच सिद्धरामय्यांनी शिवकुमारांना निमंत्रण दिले. त्यानुसार शनिवारी सकाळी 9:30 वाजता शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहे. यावेळी त्यांचे सिद्धरामय्या यांनी स्वागत केले. उभयतांमध्ये मुख्यमंत्रिपद हस्तांतर, राजकीय परिस्थिती, पक्षात निर्माण झालेला गोंधळ, वरिष्ठांकडून मिळालेली सूचना यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे तेथे मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार व आमदार ए. एस. पोन्नण्णा उपस्थित होते. वरिष्ठांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमधील चर्चेअंती झालेल्या निर्णयाचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी पोन्नण्णा यांच्यावर सोपविली असावी, अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील आमदार व मंत्र्यांनी दिल्लीला धाव घेऊन हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे राज्य काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. याला नाट्यामय वळणही मिळाले होते. अखेर दोन्ही नेत्यांना हायकमांडने फोन करून एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्या, आणि दिल्लीला या, अशी सूचना दिली होती. त्यामुळे अधिकार हस्तांतरासंबंधी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरून एकमेकांवर शेरेबाजी करणाऱ्या सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी शनिवारी मात्र, एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. आमच्यात मतभेद नाहीत, आम्ही एकत्र आहोत, हायकमांडच्या निर्णयाशी कटिबद्ध राहणार असल्याचा संदेश त्यांनी दिला.
आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते
नाश्त्याच्या निमित्ताने झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर हायकमांडने घेतलेल्या निर्णयाशी आम्ही कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. मात्र, अधिकार हस्तांतर करार, वचनाशी कटिबद्धता याबाबतच्या प्रश्नांवर उभय नेत्यांनी पत्रकारांना उत्तरे दिली नाहीत. उद्यापासून गोंधळ राहणार नाही. आमच्यात झालेल्या चर्चेविषयी हायकमांडला माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात विरोधकांना सामोरे जाण्यासाठी रणनीती
बेळगावमध्ये 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. भाजप-निजद अपप्रचार करत आहेत, खोटे आरोप करत आहे. या दोन्ही पक्षांना तोंड देण्यासाठी आम्ही चर्चा केली आहे. अधिवेशनात विरोधी पक्षाला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही 140 जण आहोत भाजपकडे 64 व निजदकडे 18 आमदार आहेत. त्यांच्याकडून अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न होत आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
आमच्यात गटबाजी नाही!
8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून विरोधी पक्षांच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याबाबत सिद्धरामय्यांशी चर्चा झाली आहे. सभागृहात विरोधी पक्षांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. आमच्यासाठी एकच गट आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. सिद्धरामय्या यांच्या पहिल्या कार्यकाळात मला सहा महिने मंत्री बनविले नव्हते. तेव्हा देखील मी एकही विधान केले नाही. एकजुटीने काम करणे ही माझी ठाम भूमिका आहे, अशी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले.
दिल्लीत खर्गे-राहुल गांधी यांच्यात चर्चा
शनिवारी सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात चर्चा झाल्यानंतर नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चा केली. दिल्लीतील राजाजी रोडवरील खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी यांनी तासभर चर्चा केल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. या बैठकीत मंत्री प्रियांक खर्गे व आमदार शरत बच्चेगौडा देखील सहभागी झाले होते. कर्नाटकातील राजकारणावर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने या विषयावरही चर्चा झाली असावी.
उद्या शिवकुमार यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी?
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर शिवकुमार यांनी, आम्ही आज (शनिवार) नाश्त्याच्या निमित्ताने एकत्र आलो. पुढील एक-दोन दिवसात सिद्धरामय्या माझ्या घरी भोजनासाठी येतील. आम्ही एकत्र काम करत आहोत, असे सांगितले. त्यामुळे सोमवारी शिवकुमार यांनी आपल्या निवासस्थानी सिद्धरामय्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
पक्षश्रेष्ठी सांगतील त्याप्रमाणे वागू : शिवकुमार
नेतृत्वाच्या मुद्द्यावर माझी आणि सिद्धरामय्यांची राजकीय भूमिका सारखीच आहे. पक्षश्रेष्ठी सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. सकाळी सिद्धरामय्या यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर पक्ष संकटात आहे. अशा प्रसंगी कर्नाटक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. 2028 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2029 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. ही निवडणूक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली लढविणार आहे. दोन्ही निवडणुकांत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. इतके दिवस एकजुटीने काम केले आहे. यापुढेही अशाच रितीने काम करण्याचा अढळ निर्धार केला आहे. कार्यकर्त्यांचे परिश्रम, जनतेचा आशीर्वाद, आणि तुमच्या सहकार्याने राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, असेही शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आगामी निवडणुकांबाबत चर्चा
काही आमदारांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेसंबंधी दिल्लीला भेट दिली आहे. त्यामुळे ते नेतृत्त्वाच्या विरोधात आहेत असे म्हणता येणार नाही. आमदारांनी माझी भेट घेऊन दिल्लीभेटीचे कारण सांगितले आहे. कोणताही आमदार, मंत्री सरकारविरुद्ध नाही. शिवकुमार व माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्षाला 2028 च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. या रणनीतीविषयी बैठकीत चर्चा केली आहे. अलिकडील काळात काही गोंधळ निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यावरही आम्ही चर्चा केली आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
वरिष्ठांची सावध भूमिका
संसदेचे अधिवेशन, विधिमंडळाचे अधिवेशन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस हायकमांडने सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे तुर्तास कोणताही धाडसी निर्णय न घेता सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनाच समझोत्याने पक्षातील गोंधळावर तोडगा काढण्याची सूचना दिली. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेवरून शिवकुमारांनी नरमाईची भूमिका घेतली असून सध्यातरी मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.