मजुरांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी : 16 जखमी
कारवार : मजुरांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन 16 मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी कैगा अणूउर्जा प्रकल्प आणि मल्लापूर (ता. कारवार) दरम्यान घडली. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली असून जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत समजलेली अधिक माहिती अशी, कैगा अणूउर्जा प्रकल्पातील अणुभट्टी क्रमांक 5 आणि 6 उभारणाऱ्या खासगी बांधकाम कंपनीत सेवा बजावणाऱ्या अन्य राज्यातील मजुरांनी रविवारी रात्रीच्या शिफ्टमध्ये सेवा बजावली आणि सोमवारी सकाळी हे मजूर खासगी टेम्पोतून मल्लापूर येथील कॉलनीकडे निघाले होते. त्यावळी कैगा अणूउर्जा प्रकल्प आणि मल्लापूर दरम्यान एका अवघड वळणावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण चुकले आणि टेम्पो पलटी झाला. या अपघातात 16 मजूर जखमी झाले आहेत. तातडीने जखमी मजुरांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणताही मजूर गंभीररित्या जखमी न झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मल्लापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. मल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.