तेलगु टायटन्स, यू मुम्बा विजयी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कब•ाr स्पर्धेतील येथे झालेल्या विविध सामन्यांत तेलगु टायटन्सने गुजरात जायंट्सचा तर यू मुम्बाने हरियाणा स्टिलर्सचा पराभव केला. यू मुम्बा संघ आता या विजयामुळे आघाडीच्या 8 संघांमध्ये प्रवेश केला आहे.
तेलगु टायटन्सने गुजरात जायंट्सचा 30-25 अशा 5 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यातील शेवटचे सत्र महत्त्वाचे ठरले. तेलगु टायटन्सतर्फे विजय मलिकने 8 गुण तर भरत हुडाने 7 गुण नोंदविले. या विजयामुळे तेलगु टायटन्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघातील आघाडी फळीच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण अवलंबले होते. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 6-6 असे बरोबरीत होते. तेलगु टायटन्सतर्फे मलिकच्या चढाया उपयुक्त ठरत होत्या. मनजितलाही या सामन्यात सूर मिळाला असल्याने त्याने गुजरात जायंट्च्या बचाव फळीवर चांगलेच दडपण आणले होते. 20 मिनिटांच्या कालावधीनंतर दोन्ही संघ पुन्हा 11-11 असे बरोबरीत राहिले होते. भरत हुडाच्या अचूक चढाईमुळे तेलगु टायटन्सला गुजरात जायंट्वर थोडी आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. पण बदली खेळाडू विश्वनाथच्या शानदार कामगिरीमुळे गुजरात जायंट्सने 30 मिनिटांच्या कालावधीनंतर तेलगु टायटन्सची 17-17 अशी बरोबरी केली होती. अजित पवार आणि अवी दुहान यांच्या संयुक्त कामगिरीच्या जोरावर तेलगु टायटन्सने गुजरात जायंट्सचे सर्वगडी बाद केल्याने या सामन्याला शेवटच्या काही मिनिटांत चांगलीच कलाटणी मिळाली. विजय मलिकने शेवटच्या पाच मिनिटांमध्ये तेलगु टायटन्सला निर्णायक गुण मिळवून दिल्याने अखेर गुजयात जायंट्सला हा सामना 5 गुणांच्या फरकाने गमवावा लागला. या सामन्यात तेलगु टायटन्स संघातील खेळाडूंची अष्टपैलु कामगिरी महत्त्वाची ठरली.
यू मुम्बा विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात यू मुम्बा संघाने हरियाणा स्टिलर्सचा टायब्रेकरमध्ये 7-4 अशा गुणांनी पराभव करत अंतिम 8 संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले. यू मुम्बा संघातील संदीपने 9 गुण नोंदविले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर हरियाणा स्टिलर्सने विनयच्या चढाईवर आपला पहिला गुण नोंदविला. त्यानंतर जयदीपने हरियाणा स्टिलर्सला आणखी एक गुण मिळवून दिला. शिवम पठारेने आपल्या चढाईवर हरियाणा स्टिलर्सला दोन गुण मिळवून दिल्याने स्टिलर्सचा संघ आघाडीवर होता. पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत हरियाणा स्टिलर्सने यू मुम्बाचे सर्वगडी बाद केल्याने हरियाणा स्टिलर्सने 10-3 अशी आघाडी मिळविली होती. दरम्यान संदीपच्या सुपर रे•वर यू मुम्बाने 4 गुण मिळविल्याने हरियाणा स्टिलर्सची आघाडी थोडी कमी झाली. हरियाणा स्टिलर्सची आक्रमक आणि बचावफळी भक्कम आणि अचूक असल्याने यू मुम्बावर अधिकच दडपण आले होते. पहिल्या सत्राअखेर हरियणा स्टिलर्सने यू मुम्बावर 13-8 अशी आघाडी मिळविली होती.
उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर विनय कुमारने यू मुम्बाला पहिला गुण मिळवून दिला. हरियाणा स्टिलर्सने यू मुम्बावर 18-12 अशी आघाडी मिळविली होती. अजित चौहानने हरियाणा स्टिलर्सचे सर्वगडी बाद केल्याने यू मुम्बाला 5 गुण मिळाले. त्यामुळे या दोन संघातील फरक केवळ दोन गुणांचा राहिला. काही मिनिटांतच यू मुम्बाने हरियाणा स्टिलर्सशी 19-19 अशी बरोबरी केली. दोन्ही संघांनी मध्यंतरावेळी 20-20 अशी बरोबरी केली होती. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर यू मुम्बाने पुन्हा आघाडी मिळविली. त्यानंतर जयदीपने 5 गुण मिळवित हरियाणा स्टिलर्सला 22-22 अशी बरोबरी साधून दिली. दोन्ही संघ निर्धारीत वेळेत 37-37 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये हरियाणा स्टिलर्सने पहिला गुण मिळविला. त्यानंतर यू मुम्बाने 1 गुण घेत बरोबरी केली. टायब्रेकरमध्ये दोन्ही संघ पुन्हा 3-3 असे बरोबरीत राहिले. यू मुम्बाने सतीश काननच्या शानदार चढाईवर 7-3 अशा फरकाने विजय मिळविला.