बाप्पा कर्मसंन्यास घेऊ की कर्मयोग आचरू ते सांगा
अध्याय चौथा
सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग हे ईश्वरप्राप्तीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी ज्ञानयोगाचा मार्ग श्रेष्ठ प्रतीच्या योग्यांचा आहे म्हणून त्या वाटेने न जाता सामान्य माणसाने आपल्या वाट्याला आलेले काम हे ईश्वराने आपल्याला नेमून दिलेले आहे हे लक्षात घेऊन ते निरपेक्षतेने करायला सुरवात करावी. हळूहळू स्वभावात फरक पडून कर्म आपोआपच निरपेक्षतेने होऊ लागते. अशा पद्धतीने जीवन जगत असताना त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि अंती तो ईश्वराशी एकरूप होतो. अशा पद्धतीने कर्म करणारा मनुष्य कर्माच्या सुरवातीपासून आनंदात असतो आणि त्यामुळे तो करत असलेले कर्म तो कौशल्याने करू शकतो.
ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही मार्गांची माहिती बाप्पांनी वरेण्यराजाला दिल्यावर आपण कोणत्या मार्गाने जावे हे न कळल्याने तो गोंधळून गेला आणि त्याने बाप्पांना अशी विनंती केली की, कर्मांचा संन्यास आणि कर्मांचा योग या दोहोचे तुम्ही वर्णन केलेत. या दोहोंपैकी जो निश्चित श्रेयस्कर असेल तो मला सांगा.
ह्या अर्थाचा संन्यस्तिश्चैव योगश्च कर्मणां वर्ण्यते त्वया । उभयोर्निश्चितं त्वेकं श्रेयो यद्वद मे प्रभो ।। 1।। हा श्लोक आपण पहात आहोत.
विवरण- अध्यात्म म्हटलं की, माणसाला संन्यास आठवतो आणि लगेच त्याच्या मनात सर्वसंगपरित्याग असा विचार येतो. थोडक्यात आहे ह्या सगळ्या घरगृहस्थीचा त्याग करायचा, कोणतंही काम करायचं नाही आणि वनात निघून जायचं असं त्याला वाटतं. त्याच्यामते घरदाराचा त्याग केला, की मनुष्य संन्यासी होतो आणि त्याने अध्यात्म म्हणा परमार्थ म्हणा साधल्यासारखे होते पण वस्तूचा, व्यक्तींचा जरी त्याग केला तरी त्यांच्याविषयीचे विचार मनात तसेच रेंगाळत राहतात. हे विचार मनात राहायचं कारण म्हणजे आपल्याला त्या व्यक्तींच्याकडून काही अपेक्षा असतात आणि एकांतात गेल्यावर त्या व्यक्ती व त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा मनात विचारांचे काहूर उठवतात. थोडक्यात मनात येणाऱ्या विचारांचं मूळ मनुष्य करत असलेल्या अपेक्षात असतं. ह्या अपेक्षा आसक्तीमुळे ठेवल्या जातात. म्हणून व्यक्ती आणि त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा याबद्दलचे विचार जर मनुष्य थांबवू शकला तर मनुष्याला घरात राहूनसुद्धा अध्यात्मसाधना करता येईल. यासाठी माणसानं निरपेक्ष होणं महत्त्वाचं आहे किंबहुना कर्मयोगाचं सारच निरपेक्षतेनं कर्म करण्यात आहे पण हे काहीही लक्षात न घेता मनुष्य संन्यास म्हणजे काम टाळणे व स्वस्थ बसणे असा सोयीस्कर अर्थ काढतो आणि आळसात दिवस घालवतो. त्याहीपुढे जाऊन देवालाच विचारतो की, मी काम करू का नको? वरेण्य राजाचा प्रश्न हा असाच असल्याने सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. कर्मसंन्यास का कर्मयोग? वास्तविक पाहता राजा ज्ञानी होता.
बाप्पांचं सांगणं त्याच्या केव्हाच लक्षात आलं असेल पण सामान्य माणसांनासुद्धा बाप्पांचा उपदेश नीट समजावा व त्यांनी त्याबरहुकूम वर्तन करावं या उद्देशाने राजा बाप्पांना विचारतोय की, देवा कर्मसंन्यास की कर्मयोग यातील माझ्या भल्याचं काय तेव्हढं उलगडून सांगा.
अर्जुनानेही हाच प्रश्न भगवंतांना गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला विचारला होता कारण त्याला युद्ध करू का नको या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर भगवंतांच्याकडून हवं होतं. तो भगवंतांना म्हणतो माझे ज्यात भले आहे ते मला सांगा. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलेलो आहे. देवाला जो मनोभावे शरण जातो त्याचा उद्धार देव नक्कीच करतात ह्या खात्रीने तो विचारतो,
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।। 3.2।।
क्रमश: