तेजिंदरपाल, सर्वेश, विथिया विजेते
वृत्तसंस्था/ लुढियाना
येथील गुरुनानक स्टेडियममध्ये घेण्यात आलेल्या इंडियन ग्रा प्री-3 अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे ऑलिम्पिक अॅथलिट्स तेजिंदरपालसिंग तूर, सर्वेश कुशारे आणि विथिया रामराज यांनी विविध क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळविले.
पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान विजेता तेजिंदरपालसिंगने 18.93 मी. ची नोंद करत सुवर्णपदक, इकबालसिंग चहलने 17.46 मी. ची नोंद करत रौप्य आणि साहिब सिंगने 17.25 मी. ची नोंद करत कांस्यपदक मिळविले. 2021 साली पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रा प्री-4 स्पर्धेत तेजिंदरपालसिंगने गोळाफेक या प्रकारात 21.49 मी. चा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.
पुरुषांच्या उंच उडीमध्ये सर्वेश कुशारेने 2.23 मी. ची नोंद करत सुवर्णपदक मिळविले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वेशने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. सर्वेशने बेंगळूर येथील झालेल्या इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस्विन शंकरने नोंदविलेला 2.21 मी. चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
महिलांच्या 400 मी. अडथळ्याच्या शर्यतीत विथिया रामराजने 55.42 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. तसेच तिने भारताची माजी धावपटू पी.टी. उषाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या क्रीडा प्रकारात मौमी जेनाने 1 मिनिट, 02.85 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर अॅलिना व्हर्गिसने 1 मिनिट, 04.02 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या भालाफेकमध्ये यशवीर सिंगने 77.89 मी. ची नोंद करत सुवर्णपदक, मनजिंदर सिंगने 71.01 मी. ची नेंद करत रौप्यपदक तर गौरव पटेलने 70.36 मी. ची नोंद करत कांस्यपदक घेतले.`