दुबई एअर शोमध्ये ‘तेजस’ कोसळले
लढाऊ विमानाच्या पायलटचा मृत्यू : वायुदलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ दुबई
दुबई एअर शो दरम्यान एक मोठा अपघात होऊन ‘तेजस’ हे एक भारतीय लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. हवाई दलाने या वृत्ताला दुजोरा देत अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. शुक्रवारी दुपारी दुबईमध्ये हा अपघात झाला. एअर शो दरम्यान विमान कोसळल्यानंतर अपघातस्थळी आगीच्या ज्वाळा पसरल्या. अपघाताचे कारण सध्या स्पष्ट करण्यात आलेले नाही.
अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये तेजस विमान वेगाने खाली पडत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये विमानाला आग लागली आणि काळा धूर निघत असल्याचे देखील स्पष्टपणे दिसून आले आहे. घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि बचाव पथकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सध्या चौकशी सुरू आहे. तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर काही कारणामुळे हा अपघात झाला आहे का हे शोधण्यासाठी तज्ञ विमानाच्या तांत्रिक बाबींची तपासणी करत आहेत. कोणत्याही एअर शो दरम्यान, लढाऊ विमाने खूप खालच्या पातळीवरून उडत असल्यामुळे अशा अपघातांची शक्यता वाढते.
‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश
पायलटला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे वायुदलाने म्हटले आहे. या दु:खद अपघाताबद्दल वायुसेनेने तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच या कठीण काळात शोकाकुल कुटुंबासोबत ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने चौकशी न्यायालय (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
विमान अचानक खाली आले
यावर्षी दुबई एअर शो 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान डीडब्ल्यूसी दुबई एअर शो स्थळी आयोजित करण्यात आला होता. या शो मध्ये तेजस विमान कोसळल्याची पुष्टी भारतीय हवाई दलाने देखील केली आहे. या घटनेशी संबंधित अधिक माहिती मिळवली जात आहे. दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान अचानक एरोबॅटिक प्रदर्शनादरम्यान खाली उतरत क्रॅश झाल्याचे वायुदलाने म्हटले आहे. अपघातानंतर एअरफील्डवर काळा धूर पसरला आणि लढाऊ विमानाला आगही लागल्याचे सांगण्यात आले. या अपघातात पायलटचा गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला प्राण गमवावे लागल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तेजस लढाऊ विमाने ही ‘एचएएल’ची निर्मिती
तेजस हे भारतीय वायुदलाचे एक अत्याधुनिक हलके आणि चपळ लढाऊ विमान असून जे पूर्णपणे भारतात विकसित केले आहे. ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेले हलके लढाऊ विमान आहे. एचएएल या विमानाचे अनेक प्रकार तयार करते. त्यामध्ये हवाई दल आणि नौदलासाठी सिंगल-सीट फायटर मॉडेल आणि दोन्ही सेवांसाठी ट्विन-सीट ट्रेनर आवृत्त्या समाविष्ट आहेत. हे जेट लढाऊ विमान 13.2 मीटर लांब आहे, त्याचे पंख 8.2 मीटर आहेत आणि ते 4.4 मीटर उंच आहे. त्यात जीईएफ404-आयएन20 इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तेजस सुपरसॉनिक (ध्वनीपेक्षा वेगवान) वेगाने उ•ाण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याची हलकी रचना आणि शक्तिशाली इंजिने ते उच्च गती आणि कार्यक्षमतेने उ•ाण करण्यास सक्षम ठरतात. तेजसमध्ये अत्याधुनिक एव्हियोनिक्स, रडार आणि शस्त्रप्रणाली असल्यामुळे ते एक अत्यंत सक्षम लढाऊ विमान बनले आहे.
दुबई एअर शो 2025 - जागतिक विमानचालन महोत्सव
दुबई एअर शो हा एक जागतिक एरोस्पेस महोत्सव बनला आहे. याचा प्रारंभ साधेपणाने झाला होता. 1986 मध्ये ‘अरब एअर’ नावाच्या एका लहान नागरी विमान वाहतूक व्यापार मेळाव्याच्या रुपात त्याची सुरुवात झाली. पहिल्या आवृत्तीत फक्त 200 प्रदर्शक आणि 25 विमाने होती. तथापि, 1989 मध्ये ते दुबई विमानतळावर स्थलांतरित करण्यात आल्यापासून त्याचा विस्तार आणि प्रभाव वाढला आहे. आज, हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावशाली एरोस्पेस कार्यक्रम बनला आहे. हा एअर शो दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो आणि जागतिक विमान वाहतूक उद्योगाला एकत्र आणतो. हा शो केवळ विमान उत्पादकांसाठी एक प्रमुख व्यासपीठ ठरतो. तसेच विमान वाहतूक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता विकासातील नवीनतम तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रदर्शित करण्याची संधी देखील प्रदान करतो. 2025 दुबई एअर शो जगभरातील आघाडीच्या विमान उत्पादक, तांत्रिक तज्ञ आणि प्रमुख विमान वाहतूक खेळाडूंच्या सहभागासह आणखी भव्य होण्याची अपेक्षा आहे.