अॅथलेटिक्समध्ये तेजस, ऐश्वर्याची विक्रमी सुवर्णधाव
अडथळा शर्यतीत तेजसची बाजी, महिलांच्या 400 मी. शर्यतीत ऐश्वर्याला गोल्ड : सिद्धांत थिंगलियाचे हुकले रौप्यपदक
वृत्तसंस्था/ डेहराडून
प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने 100 मीटर अडथळा शर्यतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या तेजसला तुल्यबळ लढत देणारा महाराष्ट्राचा सिद्धांत थिंगलिया (मुंबई) अर्ध्या शर्यतीत अडखळून खाली पडल्याने त्याचे हक्काचे रौप्यपदक मात्र हुकले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत मुंबईची ऐश्वर्या मिश्रा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
गंगा आंतरराष्ट्रीय अॅथलिट स्टेडियममध्ये रंगलेल्या या लढतीत तेजस शिरसेने 13.65 सेकंद वेळेसह निर्विवाद वर्चस्व गाजवत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याने याआधीचा राष्ट्रीय स्पर्धेतील स्वत:चा 2015 साली केलेला 13.71 सेकंद वेळेचा विक्रम आज मोडीत काढला. मात्र, त्याच्या पाठोपाठ धावणारा त्याचा सहकारी सिद्धांत थिंगलिया अखेरचे तीन अडथळे शिल्लक असताना अडखळून खाली पडला अन् त्याचे पदक जिंकण्याचे स्वप्न क्षणात धुळीस मिळाले. या गडबडीत तमिळनाडूच्या आर.मानव याने 14.03 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर केरळच्या महंमद लाझान याने 14.23 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
मुंबईच्या ऐश्वर्याला सुवर्ण
महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत ऐश्वर्या मिश्राने स्वतचाच स्पर्धा विक्रम मोडीत काढत 51.12 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. या प्रकारातील राष्ट्रीय विक्रम हिमा दास हिच्या नावावर अबाधित आहे. तिने तो 2018 साली केला होता. ऐश्वर्याने या स्पर्धेत 2022मध्ये केलेला 52.50 सेकंद वेळेचा विक्रम आज स्वत: मोडीत काढला. तमिळनाडूच्या विथया रामराज हिने 54.43 सेकंद वेळेसह रौप्य, तर गुजरातच्या देवयानी झाला हिने 54.44 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
येथील सुवर्णपदकाचा मला विशेष आनंद झाला आहे. कारण मी महाराष्ट्राला हे यश मिळवून दिले आहे. आशियाई इनडोअर स्पर्धेतील विजेतेपदाचा मला येथे फायदा झाला. भावी करिअरसाठी येथील यश मला प्रेरणादायी ठरणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे.
यंदा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पात्रता पूर्ण करण्याचे माझे नियोजन आहे कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचे माझे मुख्य ध्येय आहे.
ऐश्वर्या मिश्रा, धावपटू
राफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची रुपेरी कामगिरी, कर्नाटकला गोल्ड
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धाडसी क्रीडा प्रकारातही कौतुकास्पद वाटचाल कायम राखली आहे. स्पर्धेत प्रथमच समाविष्ठ करण्यात आलेल्या धाडसी राफ्टिंग खेळात महाराष्ट्राने रूपेरी यशाला गवसणी घातली. नेपाळ बॉर्डर जवळील बूम मंदिर नदीच्या किनाऱ्यावर सुरु असलेल्या राफ्टींग प्रकारात देवेंद्र कुमार, राखी गेहलोत, कौशिक कुमार व वैष्णवी शिंपी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने सात किलोमीटर शर्यतीत पदकासाठी शर्थ केली. 35 मिनिटे 31.761 सेकंदात शर्यत पूर्ण करीत महाराष्ट्राने दुसरे स्थान संपादन केले. कर्नाटक संघाने ही शर्यत 34 मिनिटे 7.967 सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. हिमाचल प्रदेशच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक मिश्र प्रकारात महाराष्ट्र संघाने चमकदार करीत प्रथमच राफ्टींग प्रकारातील पदक जिंकण्याचा पराक्रम केला. सात किलोमीटर शर्यत तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदिगड, उत्तराखंड, कर्नाटकासह 8 संघात शर्यत रंगली.
तलवारबाजीत महाराष्ट्राची विजयी घोडदौड
38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी मधील दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम राखली आहे. सॅब्रे व फॉईल या दोन्ही क्रीडा प्रकारांमधील वैयक्तिक गटात पदकाच्या आशा आहेत. महाराष्ट्राच्या कशिश भरड हिने तामिळनाडूच्या बेनी क्युभेई हिच्यावर मात करीत विजयी सलामी दिली. सुरुवातीपासूनच तिने आक्रमक खेळ करीत ही लढत सहज जिंकली. तिची सहकारी शर्वरी गोसवडे हिने केरळच्या एस. सौम्या हिच्यावर नेत्रदीपक विजय मिळविला. महाराष्ट्राच्या श्रुती जोशी हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. पुरुष गटात मिलिंद जहागीरदार याने बिहारच्या तुषार कुमार याला पराभूत केले तर त्याचा सहकारी शकीर अंबीर याने हरियाणाच्या सचिन कुमार याचे आव्हान संपुष्टात आणले.
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणीचा डबल धमाका
हल्दवानी :
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथ्लॉन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची हॅट्ट्रिक झळकवली. ट्रायथले प्रकारातील वैयक्तिक व मिश्र रिले प्रकारात श्रावणी नीलवर्णने सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. पाठोपाठ श्रावणीसह मयांक चाफेकरने मिश्र दुहेरीत सुवर्ण व वैयक्तिक प्रकारात कांस्य पदकांची कमाई केली.
गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथ्लॉनमध्ये हरियाणाच्या प्रतिस्पर्धींना मागे टाकून पुण्याची 16 वर्षीय श्रावणी नीलवर्णने सलग दोन सुवर्ण पदके जिंकून आजचा दिवस गाजविला. 18.57.27 मिनिटांत ट्रायथ्लॉन शर्यत पूर्ण करून महिलांच्या वैयक्तिक प्रकारात श्रावणी नीलवर्णाने महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित केले. याच प्रकारातील मिश्र रिले प्रकारात ’जय महाराष्ट्रा’चा जल्लोष दिसून आला. हरियाणा व गोवा संघाच्या जोडीला मागे टाकून श्रावणी नीलवर्ण व मयांक चाफेकर यांनी बाजी मारली. त्यांनी 18.20.45 मिनिटांत शर्यत पूर्ण करून अव्वल स्थान पटकवले.
ट्रायथ्लॉन शर्यतीत पुरूषांच्या वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राने दिवसातील सलग तिसरे पदक जिंकले. ठाणेच्या मयांक चाफेकरने 16.34.10 मिनिटांत शर्यत पूर्ण करीत कांस्य पदक संपादन केले. यजमान उत्तराखंडच्या आदित्य नेगीने सुवर्ण तर हरियाणाच्या बसंत तोमरने रौप्यपदक जिंकले. स्पर्धेतील महाराष्ट्राने हे चौथे पदक आहे.