तहसीलदार दहा दिवसांनी कार्यालयात हजर
अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर गाठले कार्यालय
बेळगाव : बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ दहा दिवसांनंतर शुक्रवारी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयातील कर्मचारी आत्महत्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी ते कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी रुद्राण्णा यडवण्णवर यांनी मंगळवार दि. 5 रोजी तहसीलदारांच्या कक्षामध्ये आत्महत्या केली. रुद्राण्णा यांनी आत्महत्येपूर्वी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तहसीलदार, तसेच अन्य दोघे आत्महत्येला जबाबदार असतील, असा संदेश पाठविला होता. याचा आधार घेत तहसीलदारांसह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संशयित तहसीलदार बसवराज नागराळ मंगळवार दुपारनंतर कार्यालयात फिरकले नव्हते. गुरुवारी त्यांना बेळगावच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर तहसीलदार नागराळ शुक्रवारी सकाळी कार्यालयात दाखल झाले. मागील दहा दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील या आशेने नागरिकही उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.