For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएएस, आयपीएस अधिकारीच ‘टार्गेट’

11:31 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएएस  आयपीएस अधिकारीच ‘टार्गेट’
Advertisement

राजस्थानमधील तरुणाला अटक : अनेक अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाऊंट

Advertisement

बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुखांच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून ऑनलाईन रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अरबाज हसमखान (वय 19, रा. कोटा खुर्द, पोस्ट किलोरा, ता. रामगढ, जि. अल्वर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. या तरुणाने केवळ बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याच नावे नव्हे तर आणखी काही आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस., अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रामगोंड बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अरबाजच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याप्र्रकरणी मध्यप्रदेशमधील विजयकुमार तिवारी (वय 46) याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती उजेडात आली असून केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला अरबाज सायबर गुन्हेगारीत तरबेज आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थानमध्ये शोधमोहीम राबविली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह आयपीएस अधिकारी बी. एस. नेमगौडा, आणखी एक आयपीएस अधिकारी मल्लिकार्जुन बालदंडी, आयएएस अधिकारी अनुकुमारी, एम. अरुणा यांच्या नावेही फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. अरबाजला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.