Solapur News : सोलापूर आरओबीवर निओप्रिन बेअरिंग बदलण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू
सोलापूर शहरात पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी
सोलापूर : विजापूर रोडवरील महत्त्वाच्या रेल्वे रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) बेअरिंग खराब झाल्याने त्या बदलण्यात येत आहेत. सोमवारी दुरुस्तीला वेग आला असून, आरओबीसाठी लागणारी नवीन निओप्रिन बेअरिंग भोपाळवरून सोलापूरला आणण्यात आली आहे. सोमवारी आरओबीच्या एका बाजूच्या पाच बेअरिंग बदलण्यात आल्या. तर मंगळवारी दुसऱ्या बाजूच्या पाच बेअरिंग बदलण्यात येणार आहेत.
१९९९ मध्ये बांधलेल्या या पुलावरील बेअरिंग पहिल्यांदाच बदलण्यात येत आहेत. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत तांत्रिक आणि संवेदनशील स्वरूपाची आहे. दरम्यान, या पुलाचे बेअरिंग साधारण २५ ते ३० वर्षांच्या अंतराने बदलण्याची आवश्यकता असते. बांधकामानंतर प्रथमच ही बेअरिंग कालबाह्य झाल्याने ती बदलणे अपरिहार्य ठरले. निओप्रिन प्रकारच्या या बेअरिंगचे आयुष्य २० ते २५ वर्षे असून, पुलाच्या सुरक्षेसाठी ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील ४५६/४ क्रमांकाच्या या आरओबीबर दोन्ही बाजूंची एकूण १० बेअरिंग बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. यातील पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी एका बाजूच्या पाच बेअरिंग बदलण्यात आल्या. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुसऱ्या बाजूच्या पाच बेअरिंग बदलण्यात येणार आहेत. यामुळे विजापूर रोडवरील या दुरुस्तीमुळे पुलाची सुरक्षितता आणि वहनशीलता लक्षणीयरीत्या वाढणार असून, पुढील अनेक वर्षे हा पूल सुरक्षितपणे वाहतुकीचे ओझे पेलणार आहे.
२४ जॅक आणले, वापर फक्त १० चा कामासाठी १०० टन क्षमतेचे २४ हायड्रॉलिक जॅ क साइटवर आणण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक प्रक्रियेनुसार १० जॅक प्रत्यक्ष वापरात असतील. गर्डर उचलणे, सांधे सैल करणे आणि नवे बेअरिंग बसवणे ही अत्यंत नाजूक प्रक्रिया असल्याने अतिरिक्त यंत्रसामग्री स्टैंडबाय ठेवण्यात आली आहे. रविवारी रात्री गर्डरच्या दोन्ही टोकांवरील जॉ इंट कटरच्या साह्याने ५० मिमी रुंद कटिंग करून गर्डर उघडण्याची प्रक्रिया करण्यात आली. हे काम करण्यासाठी लोखंडी परमनंट सेफ्टी प्लॅटफॉर्म तयार करून कामगारांना सुरक्षितता देण्यात आली आहे.
रेल्वेचा दोन दिवस ब्लॉक : वाहतूक पूर्ण बंद
रेल्वे विभागातर्फे सोमवार आणि मंगळवार हा दोन दिवसांचा दुपारी चार ते सायंकाळी सात असा तीन तासांचा ब्लॉक जाहीर केला गेला आहे. या काळात पुलावरील व रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जात आहे. ब्लॉकनंतर पुन्हा कामाची प्रगती तपासली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होणार आहे.
उच्चस्तरीय देखरेख : तज्ज्ञांची उपस्थिती
या महत्त्वाच्या तांत्रिक कामावर ३० कामगार तसेच १५ ते २० अधिकारी सतत देखरेख ठेवून आहेत. याशिवाय नाशिकहून वरिष्ठ इंजिनिअर सुहास करंदीकर विशेष मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित आहेत. रेल्वे तसेच एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी संपूर्ण कामावर सतत लक्ष ठेवत आहेत.
पर्यायी रस्ते मार्गावर वाहतूक कोंडी
पत्रकार भवन ते विजापूर रोडकडे जाणारा रस्ता बंद असल्यामुळे शहरातील वाहतूक दोन दिवस वळविण्यात आली होती. त्यामुळे पर्यायी रस्ते मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.