‘गृहलक्ष्मी’तील तांत्रिक समस्येचे लवकरच निवारण
महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
बेंगळूर : राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 95 टक्के गृहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. तांत्रिक समस्येमुळे काही जणांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. या समस्यांचे लवकरच निवारण करण्यात येईल. याकरिता दररोज तीन जिल्ह्यांच्या सीडीपीओंना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेंगळूरमधील बीडब्ल्यूएसएसबी कार्यालयात ‘बेंगळूर वन’ केंद्रात गृहलक्ष्मी योजनेंतर्गत बाल विकास योजना अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधीची माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली. गृहलक्ष्मी योजनेतील तांत्रिक समस्यांचे लवकरच निवारण करावे, अशी सूचना त्यांनी सीडीपीओंना दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत आतापर्यंत 95 टक्के लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये असणारी तांत्रिक समस्या दूर करून 15 दिवसांत सर्वांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 65 हजार महिलांनी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. यापैकी ऑगस्ट महिन्यात 97 लाख महिलांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये 5 लाख कुटुंबांना तांत्रिक समस्यांमुळे पैसे जमा झालेले नाहीत. सप्टेंबरमध्ये 82 टक्के गृहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. 12 लाख जणांच्या खात्यावर तांत्रिक समस्येमुळे किंवा केवायसी समस्येमुळे पैसे जमा झालेले नाहीत. ऑक्टोबरमधील हप्त्यासाठी 2400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
कलबुर्गी जिल्ह्यात 14 हजार अर्ज बाकी
मल्लेश्वरम येथील बेंगळूर वन केंद्रातील भेटीप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अर्जांच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली. कलबुर्गी जिल्ह्यातच 14 हजार अर्जांची पडताळणी बाकी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कलबुर्गी सीडीपीओंना फैलावर घेतले. शक्य तितक्या लवकर अर्ज निकाली काढण्यात कोणती अडचण? इतके अर्ज का बाकी? असे प्रश्न उपस्थित केले. या आठवड्यातच सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही सीडीपीओंनी दिली.
...तर एकाच वेळी तीन महिन्यांची रक्कम खात्यावर!
15 ऑगस्टपूर्वी नोंदणी केलेल्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नसतील तर त्यांच्या खात्यावर एकाचवेळी तीन महिन्यांची रक्कम जमा करण्यात येईल. आतापर्यंत पैसेच जमा झाले नसतील तर संबंधितांची बाकी असणारी रक्कम दिवाळीपर्यंत जमा करण्यात येईल. याकरिता अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असून गृहलक्ष्मी योजनेंतर्गत असणाऱ्या तांत्रिक समस्यांचे निवारण केले जात आहे, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.