पंतप्रधानांच्या विमानात तांत्रिक बिघाड
वृत्तसंस्था/ रांची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाडामुळे झारखंडमधील देवघर विमानतळावर थांबवून ठेवावे लागले. पंतप्रधानांचे विमान थांबल्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. जमुई येथील चकई येथे सभा आटोपून पंतप्रधान देवघरला परतण्यापूर्वी ही घटना घडली. तांत्रिक अडचणींमुळे विमान उडू शकले नाही.
पंतप्रधानांचे विमान तांत्रिक बिघाडामुळे अडकल्यानंतर अन्य नेत्यांच्या विमान-हेलिकॉप्टर्सनाही त्याचा फटका बसला. गो•ा येथील महागामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरही तासभर अडकले. एअर ट्रॅफिक ब्लॉकमुळे त्यांचे हेलिकॉप्टर दुपारी 2.50 च्या सुमारास उडू शकले. याशिवाय झारखंडच्या दुमका येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत असलेले हेलिकॉप्टरही बराच वेळ अडकून पडले होते. या सर्व घटनांमागे पंतप्रधानांच्या विमानातील बिघाड कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये दोन सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. तसेच झारखंडमध्ये आदिवासी समाजाचे प्रतीक बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. पंतप्रधानांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत उपस्थितांना संबोधित केले.