खो खो वर्ल्ड कपसाठी संघांची घोषणा 8 रोजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी भारताच्या पुरुष व महिला संघांची घोषणा 8 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा येथे 13 ते 19 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
15 सदस्यीय पुरुष व महिला संघांना इंडिया ए व इंडिया बी असे नाव दिले जाणार आहे. सध्या 60 खेळाडूंचे सराव शिबिर सुरू असून त्यातूनच खेळाडूंची निवड केली जाईल. येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आणि नोएडा इनडोअर स्टेडियमवर यातील सामने खेळविले जातील.
‘दोन्ही विभागातील अंतिम संघ व इंडिया ए व इंडिया बी संघांचे कर्णधार यांची घोषणा 8 जानेवारी रोजी केली जाईल,’ असे भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल म्हणाले. खो खो वर्ल्ड कप ट्रॉफी आणि शुभंकर ताराचे अनावरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मित्तल बोलताना पुढे म्हणाले की, ‘केवळ सातच दिवसांचे भरगच्च वेळापत्रक असल्याने ते लक्षात घेऊन दोन संघ उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’
पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाची प्रतीक्षा करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. पहिल्या खो खो वर्ल्ड कपमध्ये त्यांचा संघही सहभागी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. स्पर्धेची सलामीची लढत भारत व पाकिस्तान यांच्यातच 13 जानेवारी होईल. ‘पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा अद्याप मिळालेला नसल्याने थोडी धडधड वाढली आहे. मात्र सर्व गोष्टींवर वेळेत तोडगा काढला जाईल, अशी आशा वाटते,’ असेही ते म्हणाले.
या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होणार असून त्यात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील यांचाही समावेश आहे. दोन्ही विभागात साखळी व बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत. इंडोनेशिया फक्त महिलांचा संघ पाठवणार आहे तर इतर देश दोन्ही विभागासाठी संघ पाठवित आहेत. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जानेवारी रोजी, 18 जानेवारीस उपांत्य लढती आणि 19 जानेवारीस जेतेपदाची लढत होईल. या स्पर्धेत एकूण 615 खेळाडू व 125 साहायक स्टाफ सहभागी होत आहे. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारताच्या 60 महिला व पुरुष खो खो पटूंचे सराव शिबिर सुरू आहे.