भारतीय नेमबाजांचे पथक पेरुला रवाना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेरुची राजधानी लिमा येथे आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या होणाऱ्या कनिष्टांच्या विश्वचॅम्पियनशीप रायफल-पिस्तुल-शॉटगन नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजांचे पहिले पथक पेरुला रवाना झाले.
60 सदस्यांच्या या पहिल्या पथकामध्ये 40 नेमबाज, 14 प्रशिक्षक तसेच 5 सहाय्यक प्रशिक्षकवर्गातील सदस्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी सदर स्पर्धा कोरियातील चेंगवॉन येथे घेण्यात आली होती आणि त्यामध्ये भारताने 6 सुवर्ण पदकांसह 17 पदके मिळवीत पदक तक्त्यात दुसरे स्थान पटकाविले होते. चीनच्या पथकाने पदक तक्त्यात पहिले स्थान मिळविले होते. या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या भारतीय नेमबाज संघामध्ये आंतरराष्ट्रीय कनिष्ट स्तरावरील नेमबाज अभिनव शॉ, गौतमी भानोत, पार्थ माने, शांभवी क्षिरसागर, विभुती भाटीया, शार्दुल विहान, शबीरा हॅरीस, भव्या त्रिपाठी, हरमेहरसिंग लेली आणि भवतेग सिंग यांचा समावेश आहे. पेरुमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा नेमबाज मुकेश नेलावली हा पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल तसेच पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सहभागी होत आहे. सदर स्पर्धा 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे दुसरे पथक चालु आठवडा अखेर पेरुला प्रयाण करणार असून या पथकामध्ये 20 नेमबाज आणि 2 प्रशिक्षकांचा समावेश राहिल.