For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा ‘यशस्वी’ प्रारंभ

10:18 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा ‘यशस्वी’ प्रारंभ
Advertisement

भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी कसोटी जैस्वालचे नाबाद दीडशतक, सुदर्शनचे शतक हुकले : पहिल्याच दिवशी 2 बाद 318 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अरुण जेटली स्टेडियमवर यशस्वी जैस्वालचे नाबाद दीडशतक आणि साई सुदर्शनच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत 2 बाद 318 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जैस्वाल 173 आणि शुभमन गिल 20 धावांवर खेळत आहेत. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. प्रारंभी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलचा निर्णय योग्य ठरला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. केएल राहुल 38 धावा काढून बाद झाला. त्याला जोमेल वॉरिकनने बाद केले. त्यानंतर मैदानात आलेल्या साई सुदर्शन आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

Advertisement

जैस्वालचे सातवे कसोटी शतक

यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यातील पहिला दिवस चांगलाच गाजवला. या सामन्यात यशस्वी फलंदाजीला आला आणि त्याने दमदार सुरुवात केली. यशस्वीने झटपट अर्धशतक झळकावले. त्यानंतर शतकाच्या दिशेने कूच केली. यावेळी त्याने आपले सातवे शतक झळकावले. त्यानंतरही यशस्वी थांबला नाही, धडाकेबाज फटकेबाजी कायम ठेवली आणि दीडशतक झळकावले. पहिल्या दिवशीच्या खेळात यशस्वीने 173 धावांची खेळी साकारली. आपल्या खेळीत त्याने 22 चौकार लगावले. यावेळी साईनेही त्याला चांगली साथ दिली. मात्र तो शतक पूर्ण करु शकला नाही. साईने 165 चेंडूत 12 चौकारासह 87 धावांचे योगदान दिले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना साईला वॉरिकनने बाद केले.

गिलची जैस्वालला साथ

साई सुदर्शन बाद झाल्यानंतर शतकवीर जैस्वालला शुभमन गिलने त्याला चांगली साथ दिली आणि दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांत 67 धावांची भागीदारी झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 90 षटकांत 2 बाद 318 धावा केल्या होत्या. गिल 20 तर जैस्वाल 173 धावांवर खेळत होता. वेस्ट इंडिजकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र एकालाही भारताला अडचणीत आणता आले नाही. विंडीजकडून जोमेल वॉरिकॅनने दोन्ही विकेट्स मिळवल्या.

जैस्वालचा आणखी एक विक्रमी धमाका

जैस्वालने या सामन्यात 23 व्या वर्षी सर्वात जास्त शतक झळकावण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर हा वर्ल्ड रेकॉर्ड होता आणि आजही तो आहे. त्यानंतर जगभरात कोणत्याही खेळाडूला या वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत पोहोचता आले नाही. पण आता सचिननंतर थेट जैस्वालने या वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालू शकला आहे. जैस्वालच्या आधी सचिनने 23 व्या वर्षापर्यंत 11 शतके झळकावली होती. तर जैस्वालच्या नावे 7 शतके आहेत.

कोहली, गांगुलीला टाकले मागे

दुसऱ्या कसोटीतील पहिल्याच डावात यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना 3000 धावांचा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे, सर्वात कमी डावांमध्ये हा टप्पा गाठण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गजांना मागे टाकले. यशस्वी जैस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 3,000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने त्याच्या 71 व्या डावात हा टप्पा गाठला आहे. तर वेगवान 3 हजार धावांचा विक्रम हा माजी दिग्गज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 69 डावांत 3 हजार धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 90 षटकांत 2 बाद 318 (यशस्वी जैस्वाल खेळत आहे 253 चेंडूत 22 चौकारासह 173, केएल राहुल 54 चेंडूत 38, साई सुदर्शन 87, शुभमन गिल खेळत आहे 20, वॉरिकॅन 2 बळी).

Advertisement
Tags :

.