टीम इंडियाचा विजयी ‘पंच’ पाकिस्तानलाही 2-1 ने लोळवले
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : हरमनप्रीत सिंगचे दोन गोल : सामन्यात पाकचा रडीचा डाव तरीही भारताकडून करेक्ट कार्यक्रम
वृत्तसंस्था/ हुलुनबोईर (चीन)
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवत सलग पाचवा विजय मिळवला. शनिवारी झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही 2-1 असा पराभवाचा दणका दिला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने (13 व 19 वे मिनिट) दोन विजय करत विजयात मोलाचे योगदान दिले. या विजयासह गुणतालिकेत भारत 15 गुणासह अव्वलस्थानी राहिला. पाकिस्तानने 8 गुणासह दुसरे तर चीनने 6 गुणासह तिसरे स्थान पटकावले.
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. आठव्या मिनिटाला हन्नान शाहिदने झटपट भारतीय वर्तुळात पोहोचून अहमद नदीमकडे पास दिला. त्याने भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला चकवून गोल केला व पाकला 1-0 असे आघाडीवर नेले. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाने नंतर अतिशय वाईट खेळ केला आणि संघ केवळ एका गोलपुरता मर्यादित राहिला. सामन्यात पिछाडीवर असलेल्या भारताने 13 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरुन हा गोल केला.
टीम इंडियासमोर पाकचे लोटांगण
दुसरा क्वार्टरही भारताच्या नावे राहिला. सरपंच साब अर्थात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 19 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यावेळी जुगराज सिंगने सर्कलवरुन हरमनप्रीतकडे चेंडू सोपवला अन् सरपंच साबने भन्नाट गोल करत टीम इंडियाला 2-1 असे आघाडीवर नेले. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. पाकिस्तानला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले, परंतु भारताच्या बचावफळीने ही संधी हाणून पाडली. या क्वार्टरमध्ये भारतीय संघालाही गोल करण्याच्या संधी होत्या, पण संघाला त्याचा फायदा घेता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताने 2-1 अशी आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत हा सामना जिंकला.
पाकचा रडीचा डाव
सामन्यातील चौथ्या सत्रात दोन्ही संघाच्या खेळाडूत शाब्दिक चकमक पहायला मिळाली. यावेळी भारताच्या जुगराज सिंगला पाकच्या अशरफ राणाने टक्कर मारली. रडीचा डाव खेळणाऱ्या अशरफला पंचांनी यलो कार्ड दाखवत बाहेर काढले. यामुळे शेवटच्या 10 मिनिटात पाकला एका कमी खेळाडूसह खेळावे लागले. शेवटच्या काही मिनिटांत दोन्ही संघांच्या खेळाडूत चांगलेच टशन पहायला मिळाले.
फायनलमध्ये पुन्हा भारत-पाक आमनेसामने
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला. या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चीनचा 3-1, जपानचा 5-1 आणि मलेशियाचा 8-1 असा तर, दक्षिण कोरियाला 3-1 असे नमवले होते. पाकिस्तानवरील विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत 15 गुणासह अव्वलस्थानी राहिला. याशिवाय, पाकनेही या स्पर्धेत एकूण 5 सामने खेळले असून त्यात 2 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 8 गुणासह पाक संघ दुसऱ्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे, दोन्ही संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या फायनलमध्ये दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.