टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, मलेशियाचा 8-1 ने धुव्वा
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : राजकुमारचे तीन गोल : विजयासह सेमीफायनलमध्ये
वृत्तसंस्था / हुलुनबुईर (चीन)
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने चीन, जपानपाठोपाठ मलेशियाचा धुव्वा उडवला. बुधवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारताने मलेशियाला 8-1 असा पराभवाचा दणका दिला. राजकुमार पालने शानदार हॅट्ट्रिक नोंदवत विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय, अराजित सिंगने 3, जुगराज, हरमनप्रीत व उत्तम सिंगने प्रत्येकी एक गोल केला. टीम इंडियाचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय असून गुणतालिकेत आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले आहे. आज दि. 12 रोजी भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाविरुद्ध होईल. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा हा मलेशियाविरुद्ध आतापर्यंतचा मोठा विजय ठरला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी सध्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने दणक्यात जिंकल्यानंतर बुधवारी भारत व मलेशिया यांच्यात सामना झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा 8-1 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या हरमनप्रीतच्या संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला राजकुमार पालने गोल करत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सहाव्या मिनिटाला अराजित सिंगने तर सातव्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल करत भारताला 3-0 असे आघाडीवर नेले.
मलेशियाचे सपशेल लोटांगण
पहिल्या सत्रात दणकेबाज खेळ साकारल्यानंतर दुसऱ्या सत्रातही भारताने दोन गोल नोंदवले. 22 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, या संधीचे अचूक सोने करत कर्णधार हरमनप्रीतने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. पाठोपाठ राजकुमारनेही 25 व्या मिनिटाला भारताकडून पाचवा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे 5-0 अशी आघाडी होती. तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारले. राजकुमार पालने 33 व्या मिनिटाला शानदार गोल करत आपली वैयक्तिक हॅट्ट्रिक साजरी केली. यानंतर अराजित सिंगने 39 व्या तर उत्तम सिंगने 40 व्या मिनिटाला गोल केला. संपूर्ण सामन्यात मलेशियाला एकच गोल करता आला. 41 व्या मिनिटाला अखिमुल्लाहने हा गोल केला. आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाच्या रणनीतीसमोर मलेशियाचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले.
चौथ्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मलेशियाने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस भारतीय संघाने हा सामना 8-1 अशा फरकाने जिंकला व जवळपास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आज कोरियाविरुद्ध लढत होणार असून या सामन्यातही विजयी चौकार ठोकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
गुणतालिकेत भारतच अव्वल
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 3 सामन्यात 3 विजयासह 9 गुण आहेत. दक्षिण कोरिया 5 गुणासह दुसऱ्या तर पाकिस्तानही पाच गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. यजमान चीन 3 गुणासह चौथ्या, जपान पाचव्या तर मलेशिया सहाव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, कोरिया, जपान, मलेशिया आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा उपांत्य सामना 16 सप्टेंबर रोजी तर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
दक्षिण कोरिया, पाकिस्तानचा विजय
बुधवारी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात दक्षिण कोरियाने यजमान चीनला 32-2 असा पराभवाचा दणका दिला. या विजयासह कोरियाने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. चीनने कोरियाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आले नाही. आता, कोरियाची पुढील लढत आज भारताशी होणार आहे. याशिवाय, अन्य एका लढतीत पाकिस्तानने जपानला 2-1 असे हरवले. या विजयासह पाकचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. जपानचा हा दुसरा पराभव ठरला.