टीम इंडियाचा विजयी चौकार
तिसऱ्याच दिवशी इंग्लंडवर डावाने विजय : मालिकेत 4-1 फरकाने निर्भेळ यश
वृत्तसंस्था/ धरमशाला
येथील एचपीसीए मैदानावर झालेल्या पाचव्या व शेवटच्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, आर अश्विन व कुलदीप यादव यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर 1 डाव व 64 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. मालिकेत दोन शतके व तीन अर्धशतकासह 712 धावांची बरसात करणाऱ्या यशस्वी जैस्वालला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कुलदीप यादव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
हैदराबाद येथील पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग चार सामने जिंकत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत आपले अव्वलस्थान देखील अबाधित केले आहे. धरमशाला येथे झालेल्या या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बेन स्टोक्सचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला व इंग्लिश संघाला तीन दिवसातच सामना गमवावा लागला. इंग्लंडला पहिल्या डावात 218 धावा करता आल्या. यानंतर टीम इंडियाने 477 धावांचा डोंगर रचून, इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली होती. भारताची ही भली मोठी आघाडी इंग्लंडला झेपली नाही. दुसऱ्या डावातही फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 195 धावांत गारद झाला.
अश्विन व कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडची दाणादाण
आज तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी भारताने 8 बाद 473 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. भारताचे शेवटचे दोन फलंदाज अवघ्या 4 धावा करुन माघारी परतले. यामुळे भारताचा पहिला डाव सर्वबाद 477 धावांवर आटोपला. तोपर्यंत भारताने इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. अश्विनने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. सलामीवीर झॅक क्रॉलीला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर लगेचच बेन डकेटला (2) माघारी धाडत अश्विनने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. ओली पोपने 19 धावा करुन जो रुटच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विनने त्याचा अडथळा दूर केला. यावेळी इंग्लंडने अवघ्या 36 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर अनुभवी जो रुट व जॉनी बेअरस्टो या दोघांनी 56 धावांची भागीदारी साकारली. जॉनी बेअरस्टोने आपली 100 वी कसोटी संस्मरणीय करण्यासाठी काही शॉट्स खेळले, पण तो कुलदीपच्या फिरकीत अडकला आणि एलबीडब्ल्यू झाला. बेअरस्टोने 31 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. यानंतर अश्विनने कर्णधार बेन स्टोक्स (2) व बेन फोक्स (8) यांना माघारी धाडत आपले बळींचे पंचक पूर्ण केले. यावेळी इंग्लंडची 6 बाद 113 अशी स्थिती झाली होती.
टॉम हार्टली (20) आणि जो रूट यांच्यात छोटीशी भागीदारी झाली. पण बुमराहने हार्टलीला बाद केले. यानंतर दोन चेंडू खेळल्यानंतर मार्क वुडही बाद झाला. वुड बाद झाल्यानंतर शोएब बशीरने जो रूटसोबत 48 धावा जोडल्या. मात्र बशीर (13) बाद झाल्यानंतर जो रूटचाही संयम सुटला आणि तो 84 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून रुटने सर्वाधिक 12 चौकारासह 84 धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 218 व दुसरा डाव 48.1 षटकांत सर्वबाद 195 (जो रुट 84, बेअरस्टो 39, हार्टली 20, शोएब बशीर 13, अश्विन पाच बळी, कुलदीप व बुमराह प्रत्येकी दोन बळी, जडेजा एक बळी).
भारत पहिला डाव 477.
टीम इंडियाची 112 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
टीम इंडियाचा हा विजय खूप ऐतिहासिक आहे कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर, पहिल्या कसोटी सामन्यात पराभवानंतर संघाने 4-1 पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. टेस्टच्या इतिहासात फक्त तीन वेळेस असे झाले आहे की, एका संघाने पाच मॅचच्या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात हार पत्करून राहिलेले चार सामने जिंकलेले आहेत. भारताच्या आधी कसोटीत अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाने 1897-98 आणि 1901-02 साली इंग्लंडविरुद्ध केली होती. तर इंग्लंडने 1911-12 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. टीम इंडियाने हैदराबाद कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर विशाखापट्टणम, राजकोट, रांची, धरमशाला असे सलग चार विजय मिळवले. अनोख्या मालिका विजयाच्या विक्रमात आपले नाव कोरले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाच अव्वल!
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. याचा फायदा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. आजच्या विजयानंतर भारताचे गुण वाढून 68.51 टक्के झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून यापैकी 6 सामने जिंकले आहेत. दोन सामन्यात पराभव झाला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ आठव्या स्थानी आहे.
जेम्स अँडरसन, कसोटीत 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज
धरमशाला येथील पाचव्या कसोटीत जेम्स अँडरसनने कुलदीप यादव बाद करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 700 विकेट्स घेणारा अँडरसन केवळ तिसरा तर पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. वयाच्या 41 व्या वर्षी त्याने हा विक्रम केला. जागतिक क्रिकेटमध्ये 700 बळी घेण्याची किमया केवळ मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न या दोन फिरकीपटूंनाच करता आली आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला इथपर्यंत पोहोचता आलेले नाही. अँडरसनने मात्र 700 बळी घेत हा महाविक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन - 800.
शेन वॉर्न - 708.
जेम्स अँडरसन - 700.
100 व्या कसोटीत अश्विनची सर्वोत्तम गोलंदाजी
धरमशालामध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामना हा अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना होता, जो अतिशय संस्मरणीय ठरला. अश्विनने इंग्लंडविरुद्ध सामन्यात पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेत एकूण 9 बळी घेतले. यासह त्याने महान गोलंदाज मुरलीधरनचा विक्रम मोडीत काढला. कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुरलीधरनच्या नावावर होता. 2006 मध्ये मुरलीधरनने संपूर्ण कसोटी सामन्यात 141 धावांत 9 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने मात्र इंग्लंडविरुद्ध 128 धावांत 9 बळी घेतले. यासह 100 व्या कसोटी सामन्यात खेळाडूंकडून सर्वात कमी धावा देत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटपटूंना जॅकपॉट, जय शाह यांची मोठी घोषणा
भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय आता ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू करणार आहे, या अंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना भरपूर लाभ मिळणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला 15 लाख इतकं मानधन मिळतं. पण आता है पैसे तर मिळणारच आहेत. पण बोनसप्रमाणे आणखी काही एक ठराविर रक्कम खेळाडूंना मिळणार आहे. जय शाह यांनी सांगितले की, एका खेळाडूने एका सीझनमध्ये 75 टक्के (7 किंवा त्याहून अधिक) कसोटी सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्याचे 45 लाख रुपये मिळणार आहेत. 50 टक्के म्हणजे (5 किंवा 6 अधिक) कसोटी खेळणाऱ्यांना प्रति सामना 30 लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग 11 चा भाग नसतील त्यांना 15 लाख एका सामन्याचे मिळणार आहेत.