For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा विजयी ‘चौकार’

06:58 AM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा विजयी ‘चौकार’
Advertisement

सुपर फोर लढतीत पाकचा 6 विकेट्सनी उडवला धुव्वा : सामनावीर अभिषेक शर्माची 74 धावांची वादळी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आशिया कपमधील सुपर फोर सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. पाकने भारतासमोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने हे आव्हान सहजरित्या पार केले. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 तर शुभमन गिलनं 47 धावांची खेळी साकारत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या स्पर्धेत भारताने पाकवर मिळवलेला सलग दुसरा विजय ठरला. दरम्यान, सुपर फोरमध्ये टीम इंडियाचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध दि. 24 रोजी होईल.

Advertisement

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. अभिषेक आणि गिलने सुरुवातीपासून पाक गोलंदाजांची धुलाई करताना शतकी सलामी दिली. अभिषेकने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 10 व्या षटकात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. शुभमन गिल 28 चेंडूत 8 चौकारासह 47 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही न उघडता 11 व्या षटकात माघारी परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर अभिषेकने मात्र आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारासह 74 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. अभिषेक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी संघाला विजय मिळवून दिला. तिलकने नाबाद 30 तर हार्दिकने नाबाद 7 धावा केल्या. संजू सॅमसनला केवळ 13 धावा करता आल्या. पाककडून हॅरिस रौफने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

साहिबजादाचे अर्धशतक, पाकच्या 171 धावा

भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाककडून साहिबजादा फरहान आणि फखर झमानने डावाची सुरुवात केली. पण तिसऱ्याच चेंडूवर साहिबजादाचा झेल अभिषेक शर्माकडून सुटला. या जीवदानाचा साहिबजादाने फायदा घेतला. पण फखरला बाद करण्यात हार्दिक पंड्याला तिसऱ्या षटकात यश मिळाले. संजू सॅमसनने हुशारीने जमिनीलगत फखरचा 15 धावांवर झेल घेतला. झमान बाद झाल्यानंतर सईम आयुबने साहिबजादाला चांगली साथ दिली. साहिबजादाने आक्रमक शॉट्स खेळले. पण अखेर 11 व्या षटकात सूर्यकुमार यादवने चेंडू शिवम दुबेकडे सोपवला आणि दुबेने तिसऱ्या चेंडूवर सॅमला माघारी धाडले. त्याने 17 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कुलदीप यादवने वरुण चक्रवर्तीच्या हातून हुसैन तलतला झेलबाद केले. शिवमने नंतर 15 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक खेळत अर्धशतक करणाऱ्या साहिबजादालाही माघारी धाडले. साहिबजादाने 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र पाकिस्तानची धावगती मंदावली. मोहम्मद नवाज आणि कर्णधार सलमान आगा डाव सांभाळत असताना नवाज धावबाद झाला. नवाजने 21 धावा केल्या. सलमान आगा आणि फहिम अश्रफने शेवटच्या काही चेंडूमध्ये फटकेबाजी करत संघाला 20 षटकात 5 बाद 171 धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून शिवम दुबेने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 20 षटकांत 5 बाद 171 (साहिबजादा फरहान 58, फखर झमान 15, सइम आयुब 21, हुसेन तलत 10, मोहम्मद नवाज 21, सलमान आगा नाबाद 17, फहीम अश्रफ नाबाद 20, शिवम दुबे 2 बळी, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या प्रत्येकी 1 बळी)

भारत 18.5 षटकांत 4 बाद 174 (अभिषेक शर्मा 39 चेंडूत 74, शुभमन गिल 47, सूर्यकुमार यादव 0, तिलक वर्मा नाबाद 30, संजू सॅमसन 13, हार्दिक नाबाद 7, हॅरिस रौफ 2 बळी, सइम आयुब आणि फहीम अश्रफ प्रत्येकी 1 बळी).

आऊट की नॉट आऊट... झमानच्या विकेटवरुन पुन्हा वाद

पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला. झमानने 9 चेंडूत 15 धावा केल्या. तो चांगल्या लयीत फलंदाजी करत असतानाच तिसऱ्या षटकात हार्दिक पंड्याने त्याला आऊट केले. विकेटकीपर सॅमसनने त्याचा कॅच पकडला. हार्दिकने टाकलेला चेंडू मंदगतीचा होता. झमानच्या बॅटचा कडा लागून चेंडू मागे गेला. वेग कमी असल्यामुळे चेंडू संजूपर्यंत पोहोचेपर्यंत तो जमिनीच्या अगदी जवळ आला होता. सॅमसनने तो कॅच घेतला, पण तो पकडला की जमिनीला लागला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यामुळे मैदानावरील पंच गाझी सोहेल यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचानीही झमानला बाद ठरवले. यानंतर झमान पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पॅव्हेलियनकडे परतला.

बुमराहचा लाजिरवाणा विक्रम

बुमराहला ओमानविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. आशिया कप सुपर फोरमध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम इलेव्हनमध्ये परतला. पण, बुमराहने त्याच्या पुनरागमन सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम रचला. या सामन्यात त्याने 4 षटकांत 45 धावा दिल्या. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध बुमराहच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात महागडा पॉवरप्ले स्पेल ठरला. याआधी कधीच त्याने एका स्पेलमध्ये 40 धावांपेक्षा जास्त दिल्या नव्हत्या.

Advertisement
Tags :

.