For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा पाकवर ‘विराट’ विजय

06:59 AM Feb 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा पाकवर ‘विराट’ विजय
Advertisement

विराट कोहलीचे 51 वे शतक, श्रेयस, हार्दिक, कुलदीपची चमक : पाकचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

विराट कोहलीचे नाबाद शतक, श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतकी खेळी व कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकला अवघ्या 242 धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य 42.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. आता, भारताची पुढील लढत दि. 2 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल.

Advertisement

पाकने विजयासाठी दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. रोहितने नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना 15 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 20 धावा केल्या, पण शाहीन आफ्रिदीच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. यानंतर शुभमन गिल व विराट कोहली यांनी 69 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी जमलेली असतानाच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला गिल बाद झाला. 46 धावांवर त्याला अबार अहमदने बाद केले.

विराटचे वनडेतील 51 वे शतक, श्रेयसचीही फटकेबाजी

शुभमन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यादरम्यान, श्रेयसने आक्रमक खेळताना 67 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 56 धावांची शानदार खेळी साकारली. अर्धशतकानंतर तो मात्र लगेचच बाद झाला. दुसरीकडे, विराटने मात्र संयमी खेळी करताना वनड क्रिकेटमधील आपले विक्रमी 51 वे शतक साजरले केले. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराटने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे. त्याने 111 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 100 धावा केल्या. अक्षर पटेल 3 धावावर नाबाद राहिला.

पाकिस्तानची पदरी निराशा

दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी 41 धावांची सलामी दिली. पण हार्दिक पंड्या भारताच्या मदतीला धावून आला. हार्दिकने बाबरला (23) बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर अक्षर पटेलने अचूक थ्रो करत इमाम हकला रन आऊट केले. इमाम 10 धावा करत माघारी परतला. त्यावेळी भारत पाकिस्तानवर अंकुश ठेवेल, असे वाटत होते. पण मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी दमदार फलंदाजी केली.

2 बाद 151 अन् पुढील 91 धावांत ऑलआऊट

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्यावेळी अक्षर पटेल भारताच्या मदतीला धावून आला. अक्षर पटेलने रिझवानला क्लीन बोल्ड केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. रिझवानला 46 धावा करता आल्या. पण दुसरीकडे सौद शकीलने मात्र अर्धशतकी खेळी साकारताना 5 चौकारासह 62 धावांचे योगदान दिले. शकीलला हार्दिकने बाद करत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. विशेष म्हणजे, रिझवान बाद झाला तेव्हा पाकची 2 बाद 151 अशी स्थिती होती. यानंतर मात्र पुढील 91 धावांत पाकचा संघ 241 धावांत ऑलआऊट झाला.

मधल्या फळी कोसळल्यानंतर खुशदिल शाहने 2 षटकारासह 38 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. नसीम शाहने 14 धावांचे योगदान दिले. इतर पाक फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजासमोर सपशेल अपयशी ठरले. पाकचा डाव 49.4 षटकांत 242 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय, हर्षित राणा, अक्षर पटेल व रविंद्र जडेजाला प्रत्येकी एक बळी मिळाला.

‘बाय बाय’. हार्दिकचा बाबर आझमला हटके सेंड ऑफ

भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला 23 धावांवर बाद केले. यानंतर हार्दिकने त्याच्या हटके स्टाइलमध्ये केलेलं सेलीब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष बाब म्हणजे आऊट होण्याच्या आधीच्याच चेंडूवर बाबरने चौकार लगावला होता, पण त्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. बाबरने त्याच्या डावाची चांगली सुरूवात केली होती, त्याने 26 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. पण पंड्याच्या ओव्हरमध्ये कव्हर ड्राइव्ह शॉट खेळताना त्याचा बॅटच्या कडेला बॉल लागला आणि चेंडू थेट विकेटकिपर के.एल. राहूलच्या हाती पोहचला. हार्दिकने आपल्या खास शैलीत बाय-बाय‘ करत बाबरला निरोप दिला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकचे बळींचे द्विशतक तर कुलदीपचे त्रिशतक

अष्टपैलू हार्दिक पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे. हार्दिकने भारतासाठी 11 कसोटी सामन्यात 17 विकेट तर आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यात 89 विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकत्र 200 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, फिरकीपटू कुलदीप यादवने पाकविरुद्ध तीन बळी घेताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले बळींचे त्रिशतक पूर्ण केले. कुलदीपने कसोटीत 56, वनडेत 177 तर टी20 क्रिकेटमध्ये 69 बळी असे तिन्ही फॉरमॅटमध्ये एकत्र 302 बळी घेण्याची किमया केली आहे.

मोहम्मद रिझवानची हर्षित राणाला टशन

भारतीय संघाकडून हर्षित राणाने 21 वे षटक टाकले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने एक सरळ स्ट्रोक खेळला आणि नंतर धाव घेताना त्याने भारतीय गोलंदाजाला जोरात धक्का दिला. यामुळे दोन्ही खेळाडूंचा खांद्याला खांदा धडकला. त्यानंतर हर्षितने हात वर केला आणि रिझवानला रागाने काहीतरी म्हटले. यानंतर लगेचच, कॅमेरा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर गेला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुबईत जसप्रीत बुमराहची हवा

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईत पोहोचला. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. स्टेडियममध्ये त्याला आयसीसी प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला एकूण 4 पुरस्कार मिळाले. आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट प्लेयर ऑफ द इयर, टेस्ट टीम ऑफ द इयर कॅप आणि टी 20 टीम ऑफ द इयर कॅप पुरस्कार जसप्रीतला मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार बुमराहला जय शाह यांनी दुबईत प्रदान केले. यादरम्यान, बुमराह आपल्या टीम इंडियाच्या सहकाऱ्यासोबत वेळ घालवताना दिसला.

हिटमॅनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड

रोहितने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात फलंदाजीला उतरत खाते उघडताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने 2013 पासून नियमित सलामीवीर म्हणून खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक मोठे विक्रम केले आहेत. रोहितने आता सलामीवीर म्हणून असा विक्रम केला आहे, ज्यात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. हिटमॅनने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खाते उघडताच वनडेमध्ये सलामीवीर म्हणून 9 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने वनडेमध्ये केवळ 181 डावात 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहितने सर्वात कमी डावांमध्ये 9 हजार धावांचा आकडा गाठला आहे, जो एक नवा विश्वविक्रम केला आहे. याआधी सचिनने 197 डावात नऊ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 49.4 षटकांत सर्वबाद 242 (इमाम उल हक 10, बाबर आझम 23, सौद शकील 62, मोहम्मद रिझवान 46, सलमान आगा 19, खुशदिल शाह 38, नसीम शाह 14, कुलदीप यादव 3 बळी, हार्दिक पंड्या 2 बळी, हर्षित राणा, अक्षर पटेल व रविंद्र जडेजा प्रत्येकी एक बळी).

भारत 42.3 षटकांत 4 बाद 244 (रोहित शर्मा 20, शुभमन गिल 46, विराट कोहली नाबाद 100, श्रेयस अय्यर 56, हार्दिक पंड्या 8, अक्षर पटेल नाबाद 3, शाहिन आफ्रिदी 2 बळी, अबार अहमद, खुशदिल शाह प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.