टीम इंडियाचा विजयारंभ आयर्लंडवर 8 गडी राखून सहज विजय
रोहित शर्माची दमदार अर्धशतकी खेळी : सामनावीर बुमराहचे 6 धावांत 2 बळी, अर्शदीप, हार्दिकचाही भेदक मारा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टीम इंडियाने आपल्या मिशन वर्ल्डकपची सुरुवात विजयाने केली. भारताने सुरुवातीला आयर्लंडचा 96 धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने सहजपणे विजय साकारला. भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत विजयाचा पाया रचला, त्यानंतर रोहित शर्मा व ऋषभ पंतने फटकेबाजी करत त्यावर कळस चढवला. अ गटातील या सामन्यात भारताने आयर्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. यानंतर आता भारताची पुढील लढत दि. 9 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.
आयर्लंडने विजयासाठी दिलेल्या 97 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व विराट कोहली यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पण, सलामीला आलेला विराट तिसऱ्याच षटकात मार्क अडेअरच्या गोलंदाजीवर 1 धावा काढून बाद झाला. यानंतर रोहित व ऋषभ पंतने आयरिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहितने 37 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 52 धावांची शानदार खेळी साकारली. 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अडेअरने टाकलेला चेंडू रोहितच्या खांद्यावर आदळला. यावेळी खांदा दुखावल्याने रोहितने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आलेला सूर्यकुमारही स्वस्तात परतला. ऋषभ पंतने एका बाजूने फटकेबाजी करत संघाला 12.2 षटकात विजय मिळवून दिला. त्याने 26 चेंडूत नाबाद 36 धावांचे योगदान दिले. या विजयासह भारतीय संघाला दोन गुण मिळाले आहेत.
बुमराह, अर्शदीप, हार्दिकचा भेदक मारा
न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आयर्लंडचा संघ अवघ्या 16 षटकांत 96 धावांत ऑलआऊट झाला. अर्शदीप सिंगने आयर्लंडला तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. कर्णधार पॉल स्टर्लिंग 2 धावा करून बाद झाला आणि बलबर्नीलाही केवळ 5 धावा करता आल्या. आयरिश संघाने पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमावत 26 धावा केल्या होत्या. लॉर्कन टकर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, तो 10 धावा करून क्रीजवर सेट झाला होता, पण हार्दिक पंड्याने त्याला 7 व्या षटकात क्लीनड बोल्ड केले. हॅरी टेक्टरची बॅटही शांत राहिली, त्याला 16 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. यानंतर ठराविक अंतराने आयर्लंडच्या विकेट पडत गेल्या. आयरिश संघाचे केवळ 4 फलंदाज दुहेरी आकडा ओलांडू शकले आणि उर्वरित 7 फलंदाजांना 10 धावांचा आकडाही ओलांडता आला नाही. आयर्लंडकडून सर्वाधिक धावा गॅरेथ डेलेनीने केल्या, त्याने 14 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 26 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. हार्दिकने एकूण 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेत आयर्लंडला मोठी धावसंख्या बनवण्यापासून वंचित ठेवले. मोहम्मद सिराज व अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड 16 षटकांत सर्वबाद 96 (लॉर्कन टकर 10, कॅम्फेर 12, गॅरेथ डेलेनी 14 चेंडूत 26, जोश लिटल 14, हार्दिक पंड्या 3 बळी, बुमराह व अर्शदीप प्रत्येकी दोन बळी, सिराज व अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी). भारत 12.2 षटकांत 2 बाद 97 (रोहित शर्मा 37 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 52, विराट कोहली 1, ऋषभ पंत 26 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह नाबाद 36, सूर्यकुमार यादव 2, शिवम दुबे नाबाद 0, मार्क अडेअर व बेन व्हाईट प्रत्येकी 1 बळी).
रोहित शर्माच्या टी-20 मध्ये 4 हजार धावा
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 37 चेंडूत 52 धावा केल्या. या दरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4 हजार धावाही पूर्ण केल्या. तसेच, त्याने बाबर आझमला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसरे स्थान पटकावले आहे. रोहितच्या नावे आता 4026 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत भारताचा विराट कोहली 4038 धावासह पहिल्या स्थानी आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- विराट कोहली - 118 सामने, 4038 धावा
- रोहित शर्मा - 152 सामने, 4026 धावा
- बाबर आझम - 119 सामने, 4023 धावा
- पॉल स्टर्लिंग - 143 सामने, 3591 धावा