टीम इंडियाचा विजयी ‘तिलक’
दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर मात : सामनावीर तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ चेन्नई
अखेरपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने थरारक विजय साकारला. तिलक वर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावरच भारताला या सामन्यात विजय साकारता आला. इंग्लंडने भारतापुढे 166 धावांचे आव्हान ठेवले होते. एकवेळ भारताची 5 बाद 78 अशी बिकट अवस्था झाली होती. पण तिलक वर्माने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. तिलकने नाबाद 72 धावांची खेळी साकारत भारताला दोन विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरा सामना दि. 28 रोजी राजकोट येथे होईल.
इंग्लंडच्या 166 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धडाकेबाज झाली खरी, पण ती आश्वासक नव्हती. अभिषेक शर्माने सुरुवातीला तीन चौकारांसह 12 धावा लुटल्या, पण तो 12 धावांवरच दुसऱ्या षटकात बाद झाला. संजू सॅमसन यावेळी फक्त पाच धावा करू शकला. सूर्यकुमार यादव 12 आणि हार्दिक पंड्या 7 धावांवर बाद झाले आणि भारताचा डाव अडचणीत सापडला. पण यावेळी भारताच्या मदतीला धावून आला तो तिलक वर्मा. तिलक वर्माला यावेळी चांगली साथ मिळाली ती वॉशिंग्टन सुंदरची. तिलक आणि सुंदर यांनी यावेळी इंग्लंडच्या गोलंदजीचा चांगलाच समाचार घेतला आणि संघाला विजयाच्या मार्गावर आणले. सुंदरने 26 धावा करत तिलकला चांगली साथ दिली, पण तो जास्त काळ टिकू शकला नाही. त्यानंतर तिलकच्या साथीला आला तो अक्षर पटेल. पण त्यानंतर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग लवकर बाद झाले. पण, तिलकने अखेरपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 55 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह नाबाद 72 धावांची खेळी साकारली. रवि बिश्नोई 9 धावांवर नाबाद राहिला. तिलकच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयी लक्ष्य 19.2 षटकांतच पूर्ण करत विजय मिळवला.
कर्णधार बटलरची आक्रमक खेळी
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताने टॉस जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिल सॉल्टला (4) अर्शदीपने पहिल्याच षटकांत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर बेन डकेटही चौथ्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. अनुभवी हॅरी ब्रुक (13) व लियाम लिव्हिंगस्टोन (13) यांनी देखील निराशा केली. दुसरीकडे, कर्णधार जोस बटलरने इंग्लंडसाठी 150 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 45 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 3 षटकार लगावले. तर ब्रायडन कार्सेने 17 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय, जेमी स्मिथने 12 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. जोफ्रा आर्चर 12 धावा, आदिल राशिदने 10 धावा केल्या. यामुळे पाहुण्या इंग्लिश संघाला 20 षटकांत 9 गडी गमावत 165 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 9 बाद 165 (जोस बटलर 45, हॅरी ब्रुक 13, लिव्हिंगस्टोन 13, जेमी स्मिथ 22, ब्रेडॉन कार्से 31, आर्चर नाबाद 12, रशीद 10, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी दोन बळी, अर्शदीप, हार्दिक, वॉशिंग्टन व अभिषेक शर्मा प्रत्येकी एक बळी).
भारत 19.2 षटकांत 8 बाद 166 (सॅमसन 5, अभिषेक शर्मा 12, तिलक वर्मा नाबाद 72, सुर्या 12, वॉशिंग्टन सुंदर 26, कार्से 3 बळी, आर्चर, मार्क वूड, रशीद, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी).