टीम इंडियाचा ‘विजयारंभ’
चॅम्पियन्स ट्रॉफी : बांगलादेशवर 6 गडी राखून मात : सामनावीर शुभमन गिलचे नाबाद शतक, मोहम्मद शमीचे पाच बळी, तौहिदचे झुंजार शतक वाया
वृत्तसंस्था/दुबई
मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर सलामीवीर शुभमन गिलने केलेल्या धमाकेदार इंनिगच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशवर 6 गडी राखून विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव 229 धावांत आटोपला. यानंतर भारतीय संघाने विजयासाठीचे लक्ष्य 46.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शुभमन गिलने नाबाद शतकी खेळी टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता, भारतीय संघाचा पुढील सामना दि. 23 रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. बांगलादेशने दिलेल्या 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मा झटपट खेळी करत 7 चौकारांसह 41 धावा करत बाद झाला. तर विराट कोहली 22 धावा, श्रेयस अय्यर 15 धावा, अक्षर पटेल 8 धावा करत बाद झाले. विराट, श्रेयस आणि अक्षरचे लागोपाठ विकेट गेल्यानंतर भारतीय संघ आता पेचात अडकतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. पण नंतर आलेल्या केएल राहुलने गिलबरोबर संघाचा डाव सावरत विजयाकडे नेले.
शुभमनचे नाबाद शतक
प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणाऱ्या शुभमनने संयमी व सुरेख खेळी साकारताना वनडे कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने 129 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह नाबाद 101 धावांची खेळी साकारली. त्याला केएल राहुलने 47 चेंडूत 41 धावा करत मोलाची साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने 2 विकेट्क घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला झटपट 5 धक्के देत फलंदाजांची हवा टाईट केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सौम्या सरकारला पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार शांतोलाही पुढील षटकात हर्षित राणाने माघारी धाडले. या दोघांनाही भोपळाही फोडता आला नाही. यानंतर लागोपाठ मेहंदी हसन मिराज (5), मुशफिकुर रहीम (0) व तंजिद हसन (25) हे लागोपाठ बाद झाल्याने बांगलादेशची 5 बाद 35 अशी बिकट स्थिती झाली होती.
तौहिद हृदोयचे शतक अन् बांगलादेशचे द्विशतक पार
या कठीण स्थितीत तौहिद हृदोय व जाकेर अली यांनी निर्णायक भागीदारी करत बांगलादेशची लाज राखली. या दोघांनी संयमी खेळी साकारताना सहाव्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. ह्रदोयने मात्र धडाकेबाज फटकेबाजी करत शतक झळकावले आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला सहजपणे गाठून दिला. त्याने 118 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 100 धावांची खेळी केली. त्याला जाकेर अलीने 4 चौकारासह 68 धावा करत मोलाची साथ दिली. याशिवाय, रिशाद हुसेनने 18 धावांचे योगदान दिले. इतर बांगलादेशी फलंदाज मात्र फ्लॉप ठरल्याने त्यांचा डाव 49.4 षटकांत 228 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 53 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली. याशिवाय, हर्षित राणाने 3 तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले.
मोहम्मद शमीचे पंचक, विक्रमाला गवसणी
दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या मोहम्मद शमीने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेत वनडेत 200 विकेट्स पूर्ण केले. करत झहीर खानचा मोठा विक्रम मोडला आहे. यासह तो मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकले आहे. आयसीसी स्पर्धेत झहीरने 32 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या होत्या. पण आता शमीने 19 वनडेत 60 बळी घेत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. विशेष म्हणजे, शमी वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा आठवा भारतीय बॉलर बनला. त्याने 104 मॅच आणि 103 इनिंगमध्ये हा टप्पा गाठला. याशिवाय, शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला बॉलर बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकत हा रेकॉर्ड केला. स्टार्कने 5240 बॉलमध्ये 200 विकेट्स घेतल्या. तर शमीने हा टप्पा 5126 बॉलमध्ये पूर्ण केला.
वनडेत सर्वात कमी चेंडूत वेगवान 200 विकेट्स घेणारे गोलंदाज
- 5126 बॉल - मोहम्मद शमी, भारत
- 5240 बॉल - मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया
- 5441 बॉल - सकलेन मुश्ताक, पाकिस्तान.
हिटमॅनचा आणखी एक विक्रम, वनडेत 11 हजार धावा
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. मात्र, या यादीत नंबर वन फलंदाज विराट कोहली आहे. रोहितने बांगलादेशविरुद्ध 11 धावा करताच, त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी 11 हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
सर्वात कमी डावात 11 हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू
- विराट कोहली - 222 डाव
- रोहित शर्मा - 261 डाव
- सचिन तेंडुलकर - 276 डाव
- रिकी पॉटिंग - 286 डाव.
रोहितने झेल सोडल्याने अक्षर पटेलची हुकली हॅट्ट्रिक
बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकांत अक्षर पटेलने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेतले. अक्षर हॅट्ट्रिकसाठी तयार होता आणि त्याने तसा उत्कृष्ट चेंडूही टाकला. रोहितने स्लिपमध्येही फिल्डर उभे केले होते, ज्यात तो स्वत: पहिल्या स्लिपमध्ये होता. जाकेर अलीच्या बॅटची कड घेत अगदी रोहितच्या जवळ चेंडू आला आणि रोहित झेल टिपायला जाणार तितक्यात घाईत चेंडू हातात न येता खाली पडला आणि तो झेल सुटला. यानंतर कॅच ड्रॉप झाल्याचे पाहताच त्याने जमिनीवर हात आपटत स्वत:वर राग काढला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 49.4 षटकांत सर्वबाद 229 (तंजिद हसन 25, तोहिद हदोय 100, जाकेर अली 68, रिशाद होसेन 18, मोहम्मद शमी 53 धावांत 5 बळी, हर्षित राणा 31 धावांत 3 बळी, अक्षर पटेल 2 बळी).
भारत 46.3 षटकांत 4 बाद 231 (रोहित शर्मा 41, शुभमन गिल 129 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह नाबाद 101, विराट कोहली 22, श्रेयस अय्यर 15, अक्षर पटेल 8, केएल राहुल नाबाद 41, रिशाद होसेन 2 बळी).