For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा टी 20 मालिकाविजय

06:58 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा टी 20 मालिकाविजय
Advertisement

पाचव्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलिया 6 धावांनी पराभूत : मालिका 4-1 फरकाने खिशात

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी 20 4-1 फरकाने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 बाद 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर सामना जिंकण्यासाठी 161 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना 8 बाद 154 धावापर्यंतच मजल मारता आली.

Advertisement

भारताने विजयासाठी दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोस फिलिप्स 4 धावा काढून बाद झाला. यानंतर ट्रेव्हिस हेड व बेन मॅकडरमोट यांनी संघाचा डाव सावरला. हेडने 18 चेंडूत 28 धावा केल्या. तर मॅकडरमोटने 36 चेंडूत 5 षटकारांची आतषबाजी करत 54 धावांचे योगदान दिले. याशिवाय, टीम डेविडने 17 तर मॅथ्यू शॉर्टने 16 धावा केल्या. विशेष म्हणजे, 19 व्या षटकापर्यंत सामना कांगारूंच्या हातात होता, पण अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने 10 धावांचा बचाव करून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अर्शदीपने 20 व्या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडला बाद करून भारताचा विजय निश्चित केला होता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वेडला धावा एकही धाव करू दिली नाही. तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. यानंतर जेसन बेहरेनडॉर्फ चौथ्या चेंडूवर केवळ एक धाव काढू शकला. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने 1 धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने 6 धावांनी सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला या सामन्यात मात्र अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड या जोडीने 4 षटकांत 33 धावांची सलामी दिली. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात जैस्वाल 17 चेंडूत 21 धावा काढून बाद झाला. तर पुढील षटकात ऋतुराजही 10 धावा काढून तंबूत परतला. सलामीची जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांनी देखील निराशा केली. सुर्यकुमारला 5 तर रिंकूला 6 धावा करता आल्या.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

55 धावांत 4 विकेट पडल्यानंतर श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा यांनी 42 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारतीय डावाला गती दिली. जितेशने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावांचे योगदान दिले. यानंतर श्रेयसने अक्षर पटेलसह 46 धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारीमुळे भारताला आठ विकेट्सच्या मोबदल्यात 160 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 53 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अक्षर पटेलनेही 21 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 31 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियातर्फे जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन ड्वानशुईसने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक :

भारत 20 षटकांत 8 बाद 160 (यशस्वी जैस्वाल 21, ऋतुराज गायकवाड 10, सुर्यकुमार यादव 5, रिंकू सिंग 6, जितेश शर्मा 24, अक्षर पटेल 31, श्रेयस अय्यर 37 चेंडूत 53, बिष्णोई 2, अर्शदीप नाबाद 2, बेहरनडॉर्फ व ड्वानशुईस प्रत्येकी दोन बळी, हार्डी, संघा, एलिस प्रत्येकी एक बळी)

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 154 (ट्रेव्हिस हेड 28, बेन मॅकडरमोट 54, टीम डेव्हिड 17, मॅथ्यू शॉर्ट 16, वेड 22, मुकेश कुमार 3 तर अर्शदीप, रवि बिष्णोई प्रत्येकी दोन बळी)

ऋतुराजला कमी पडल्या 9 धावा, विराटचा विक्रम अबाधित

एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने अनोखा विक्रम स्वत:च्या नावे केला. ऋतुराज हा कोणत्याही टी 20 मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. यावेळी त्याला विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती, पण त्याला 9 धावा कमी पडल्या. ऋतुराजने 12 चेंडूत 10 धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत हा मोठा पराक्रम केला. 10 धावा करताच संपूर्ण मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने यावेळी मिळवला.

टी 20 मालिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

231 धावा - विराट कोहली, वि इंग्लंड

224 धावा -  केएल राहुल, वि न्यूजीलंड

Advertisement
Tags :

.