आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
जपानचा 5-1 ने उडवला धुव्वा : सुखजीत सिंगचे 2 तर अभिषेक, उत्तम सिंग, संजयचा प्रत्येकी एक गोल
वृत्तसंस्था/ हुलुनबुईर (चीन)
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपला विजयी धडाका कायम राखत जपानचा पराभव केला. सोमवारी हुलुनबुईर येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 असा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय असून यापूर्वी भारताने यजमान चीनचा 3-0 असा पराभव केला होता. आता, दि. 11 रोजी भारताची पुढील लढत मलेशियाविरुद्ध होईल. सुखजीत सिंगने 2 तर अभिषेक, उत्तम सिंग व संजय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सोमवारी जपानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला. सामना सुरू झाल्यानंतर दोन मिनिटांतच दोन गोल केले होते. भारतासाठी पहिला गोल सुखजित सिंगने तर दुसरा गोल अभिषेकने केला. पहिल्या सत्राच्या खेळानंतर टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर होती. दुसऱ्या सत्रात संजयने 17 व्या मिनिटाला गोल करत भारताला 3-0 असे आघाडीवर नेले. यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. याउलट 41 व्या मिनिटाला जपानच्या काझुमासाने मैदानी गोल करत आघाडी 3-1 अशी कमी केली. जपानसाठी हा पहिलाच गोल ठरला.
शेवटच्या सत्रात उत्तम आणि सुखजीत यांनी एकापाठोपाठ दोन गोल केले. 54 व्या मिनिटाला उत्तम सिंगने मैदानी गोल केला. तर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला सुखजित सिंगने गोल करत भारताची आघाडी 5-1 अशी वाढवली. जपानने गोल करण्यासाठी शेवटपर्यंत अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस भारताने हा सामना 5-1 असा जिंकत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दरम्यान, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारी मलेशियाशी भिडणार आहे. सहा संघांमधील राऊंड-रॉबिन लीगनंतर, अव्वल चार संघ 16 सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.
गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे 2 सामन्यात 2 विजयासह 6 गुण आहेत. चीन 3 गुणासह दुसऱ्या, दक्षिण कोरिया 2 गुणासह तिसऱ्या तर पाकिस्तान 2 गुणासह चौथ्या स्थानी आहे. आता, भारतीय संघाचा पुढील सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाचा हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न असेल.
चीनचा मलेशियावर विजय, कोरिया-पाक सामना बरोबरीत
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सोमवारी झालेल्या अन्य लढतीत यजमान चीनने मलेशियाचा 4-2 असा पराभव केला. आक्रमक खेळणाऱ्या चीनने या संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. चीनचा हा दोन सामन्यातील पहिला विजय आहे. याआधी सलामीच्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय, स्पर्धेतील दक्षिण कोरिया व पाकिस्तान यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत प्रतिकार केला पण त्यांना यश आले नाही. बरोबरीनंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला.