For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा विक्रमी 17 वा मालिकाविजय

06:58 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा विक्रमी 17 वा मालिकाविजय
Advertisement

रांची कसोटीत इंग्लंडवर 5 गड्यांनी मात : युवा ध्रुव जुरेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील यंग ब्रिगेडने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय संघासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. साहेबांचं लक्ष्य स्वीकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेरीस बिनबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच झटपट विकेट गेल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती, पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना दि. 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.

Advertisement

प्रारंभी, इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांत आटोपल्यानंतर भारताने 307 धावा केल्या. यानंतर अश्विन व कुलदीपच्या भेदक माऱ्यासमोर साहेबांचा दुसरा डाव 145 धावांवर संपुष्टात आला व भारताला विजयासाठी 192 धावांचे टार्गेट मिळाले. टीम इंडियाने हे विजयी आव्हान 61 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका खिशात टाकली. विशेष म्हणजे, कठीण परिस्थितीत पहिल्या डावात 90 व दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची खेळी साकारणाऱ्या पदार्पणवीर ध्रुव जुरेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

रोहित, गिलची अर्धशतके

 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक खेळताना 8 षटकांत बिनबाद 40 धावा केल्या होत्या. रांचीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देणारी असल्याने चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 152 धावांची आवश्यकता होती. खेळाला सुरुवात झाल्यानंतर रोहित व जैस्वालने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. या जोडीने 84 धावांची सलामी दिली. पण डावातील 18 व्या षटकांत भारताला पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला, तो पार्टटाइम फिरकी गोलंदाज जो रूटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनच्या हाती झेलबाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर काही वेळातच रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर टॉम हार्टलीच्या चेंडूवर विकेटच्या मागे रोहित झेलबाद झाला. त्याने 81 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 55 धावांचे योगदान दिले. रोहित बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारला भोपळाही फोडता आला नाही.

उपाहारानंतर शोएब बशीरने रवींद्र जडेजा आणि सरफराज खानला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना रोमांचक टप्प्यावर नेला. 120 धावांत 5 गडी बाद झाल्याने भारताला उपयुक्त भागीदारीची नितांत गरज होती. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी चाहत्यांना निराश न करता भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजयाकडे नेले. गिल आणि जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची नाबाद भागीदारी केली. गिलने 124 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 52 तर जुरेलने 77 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 39 धावा केल्या. इंग्लंडकडून बशीरने 3 तर हार्टली व रुटने एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 353 व दुसरा डाव 145

भारत पहिला डाव 307 व दुसरा डाव 61 षटकांत 5 बाद 192 (रोहित शर्मा 55, यशस्वी जैस्वाल 37, शुभमन गिल नाबाद 52, ध्रुव जुरेल नाबाद 39, बशीर 79 धावांत 3 बळी, हार्टली व रुट प्रत्येकी एक बळी).

मायदेशात एक तप अजिंक्य

रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला. विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अर्थात, ही कसोटी मालिका जिंकत टीम इंडियाने नवा इतिहास रचला आहे. गेल्या 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा मालिका विजय आहे. मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे झाला आहे. भारताला नोव्हेंबर 2012 मध्ये घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा इंग्लंडने भारताचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे.

इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयाची हॅट्ट्रिक

मायदेशात खेळताना टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्यांदा मालिकाविजय संपादन केला आहे. 2012 मध्ये अॅलेस्टर कुकच्या इंग्लंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. यानंतर मात्र टीम इंडियाने 2016-17 मध्ये इंग्लंडला 4-0 असे तर 2020-21 मध्ये 3-1 असे पराभूत केले. आता, यंदाच्या वर्षी पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेत आपली हॅट्ट्रिक साजरी केली आहे.

प्रतिक्रिया

युवा संघाचा हा शानदार मालिका विजय आहे. सर्व खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी दाखवली आणि आपल्या जिद्दीने संघाला मोठा विजय मिळवून दिला.

विराट कोहली, भारतीय क्रिकेटपटू

युवा ध्रुवची ताऱ्यासारखी चमक, पदार्पणातच सामनावीर

रांची कसोटीत भारताच्या विजयाचा हिरो ठरला युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल. दोन्ही डावात तो टीम इंडियासाठी ट्रबलशूटर ठरला. त्याने भारताच्या दोन्ही डावात दडपणाखाली शानदार फलंदाजी करत विजयात मोलाचे योगदान दिले. या महत्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. जुरेलच्या या खेळीसह कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविडसह अनेक आजी माजी खेळाडूंनी त्याचे कौतुक केले.

मालिका जिंकूनही भारत अव्वल नाही

भारताने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2023-25 सायकलमध्ये आपला 8 वा सामना खेळला आणि पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकूनही भारतीय संघ दुस्रया क्रमांकावर कायम आहे. भारताचे 62 गुण असून त्याची टक्केवारी 64.58 आहे. दुसरीकडे किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 36 गुण आणि टक्केवारी 75 आहेत. ते अव्वलस्थानी कायम आहेत. इंग्लंडची अवस्था बिकट असून गुणतालिकेत ते आठव्या स्थानी आहेत.

Advertisement
Tags :

.