कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईडन गार्डन्सवर टीम इंडियाची दाणादाण

06:58 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लो स्कोअरिंग सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय : सामनावीर सिमॉन हार्मरची कमाल  

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघाने जोरदार कमबॅक करत भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा दणका दिला आहे. हिरव्यागार ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 30 धावांनी नमवत 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना तिसऱ्या दिवशी संपणार हे निश्चित होते, पण सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. पण पाहुण्या संघाने कमालीच्या कामगिरीसह 15 वर्षांनी भारतात कसोटी जिंकण्याचा डाव साधला. विजयासाठी मिळालेल्या 124 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 93 धावांतच आटोपला. उभय संघातील दुसरा व शेवटचा सामना दि. 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होईल.

प्रारंभी, आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावांत आटोपला. यानंतर भारतीय संघाने 189 धावा करत पहिल्या डावात 30 धावांची अल्प आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत आफ्रिकेचा कणा मोडला. केवळ 91 धावांपर्यंत पोहोचतानाच आफ्रिकेने 7 विकेट गमावल्या होत्या. पण, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने कौतुकास्पद आणि संयमी खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात त्याने जबरदस्त खेळ साकारला, याशिवाय तिसऱ्या दिवशीही त्याने आपली झुंज कायम ठेवली. बावुमाने 136 चेंडूत 4 चौकारासह सर्वाधिक नाबाद 55 धावांची खेळी साकारली. याशिवाय, कॉर्बिन बॉश (25) याच्या सोबतीने आठव्या विकेटसाठी 44 धावांची महत्त्वाची भागीदारी उभी केली. शेवटी, आफ्रिकेच्या अखेरच्या दोन विकेट सिराजने घेतल्या. सायमन हार्मर (7) आणि केशव महाराज (0) यांना स्वस्तात माघारी पाठवले आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवर आटोपला आणि टीम इंडियाला विजयासाठी 124 धावांचे टार्गेट मिळाले. भारताकडून जडेजाने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 बळी मिळवले. बुमराह आणि अक्षर पटेलने देखील 1 बळी घेतला.

भारताचे सगळेच दिग्गज फेल

आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या 124 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. यशस्वी जैस्वालला भोपळाही फोडता आला नाही. केएल राहुलही एका धावेची भर घालून माघारी परतला. यामुळे एका धावेवरच भारताने दोन विकेट गमावल्या होत्या. पण, नंतर वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, हार्मरने जुरेलला (13 धावा) बाद करत ही जोडी फोडली. ऋषभ पंतही स्वस्तात बाद झाला अक्षर पटेलने सर्वाधिक 26 धावा करत काही काळ विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. पण, त्यालाही केशव महाराजने तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने 18 धावांची खेळी साकारली तर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने भारतीय संघ दुसऱ्या डावात 93 धावांत ऑलआऊट झाला. आफ्रिकेने पहिला सामना 30 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आफ्रिकेकडून सिमॉन हार्मरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. केशव महाराज आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी 2-2 तर मार्करमने एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव 159 आणि दुसरा डाव 153.

भारत पहिला डाव 189 आणि दुसरा डाव 35 षटकांत सर्वबाद 93 (यशस्वी जैस्वाल 0, केएल राहुल 1, वॉशिंग्टन सुंदर 31, ध्रुव जुरेल 13, ऋषभ पंत 2, रविंद्र जडेजा 18, अक्षर पटेल 26, कुलदीप यादव 1, सिमॉन हार्मर 21 धावांत 4 बळी, केशव महाराज आणि यान्सेन प्रत्येकी 2 बळी, मॅरक्रम 1 बळी).

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाला फटका

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडियाला 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बसला असून भारतीय संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. आफ्रिकेविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वी भारत तिसऱ्या स्थानी होता. मात्र कोलकाता कसोटीमधील पराभवानंतर भारत चौथ्या स्थानावर घसरला असून टक्केवारी आता 54.17 आहे. भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले असून ज्यात 4 विजय आणि 3 पराभव झाले आहेत. दुसरीकडे, कोलकाता कसोटीमधील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने चौथ्या स्थानावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 100 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर श्रीलंका 66.67 टक्के गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तान 50 टक्के गुणांसह पाचव्या, तर इंग्लंड 43.33 टक्के गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

15 वर्षात प्रथमच आफ्रिकेने भारतात जिंकला कसोटी सामना

पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला. हा विजय आफ्रिकेसाठी अतिशय खास ठरला. गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी सामना जिंकला आहे. आफ्रिकेने भारतात शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आफ्रिकेला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. पण, बावुमच्या नेतृत्वाखाली यंदा मात्र इतिहास रचला.

13 वर्षानंतर ईडन गार्डन्सवर टीम इंडिया पराभूत

द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यामुळे टीम इंडियाला चांगलाच दणका बसला आहे. विशेष म्हणजे, 13 वर्षानंतर भारताने ईडन गार्डन्सवर पहिल्यांदाच कसोटीत हार पत्कारली आहे. याआधी भारतीय संघाचा शेवटचा पराभव 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध सात विकेट्सनी झाला होता.

 टेंबा बावमुचा विक्रम अबाधित

टेम्बा बावुमाने कर्णधार म्हणून 11 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने 10 जिंकले आणि एक अनिर्णित राहिला. या विजयासह बावमुने आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने एकही सामना गमावलेला नाही.

 सामना नेमका कुठे फिरला, पंतने सांगितला टर्निंग पॉईंट

सामना नेमका कुठे फिरला याबाबत ऋषभ पंत म्हणाला, आम्ही हे लक्ष्य सहज पूर्ण करायला हवे होते. दुसऱ्या डावात आमच्यावरील दबाव आणखी वाढत गेला. त्यामुळे आम्ही संधीचा फायदा घेऊ शकलो नाही, असे तो म्हणाला. सामन्यातील टर्निंग पॉईंटबद्दल बोलताना पंत म्हणाला, तेंबा आणि बॉशने महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे ते सामन्यात परतले आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

 पराभवास कारण की....

ईडन गार्डन्सवर टीम इंडियाच्या झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर हा पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. ईडन गार्डनवरील खेळपट्टीवर टीका केला जात आहे. पण असे असताना गौतम गंभीरने मात्र या खेळपट्टीचे समर्थन केले आहे. जशी खेळपट्टी हवी होती अगदी तशीच खेळपट्टी मिळाली. पण भारतीय संघाने खूपच वाईट फलंदाजी केली. क्यूरेटरने खूपच मदत केली. पण तुम्ही चांगले खेळले नाही तर असंच घडतं. एकप्रकारे त्याने फलंदाजांवर पराभवाचे ताशेरे ओढले आहेत.

अविस्मरणीय विजय...

भारताविरुद्ध भारतात खेळणे नेहमीच कठीण असते. पण, ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर विजय मिळवल्यामुळे हे सारेच अविस्मरणीय असे आहे. सिमॉन हार्मरसह सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, यामुळेच आफ्रिकन संघाला विजय मिळवता आला.

कर्णधार टेंबा बावुमा, दक्षिण आफ्रिका

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article