टीम इंडियाचे मिशन द.आफ्रिका
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली चार टी-20 सामने खेळणार : युवा खेळाडूंवर मदार
वृत्तसंस्था/ डर्बन (द.आफ्रिका)
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 4 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आफ्रिका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष्य असणार आहे. उभय संघातील पहिला सामना टी 20 सामना दि. 8 नोव्हेंबर रोजी डर्बन येथे खेळवला जाणार आहे.
रोहित व विराटच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवकडे टी 20 क्रिकेटच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. अलीकडील काळात सुर्याच्या नेतृत्वात टी 20 मध्ये भारताने शानदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण या टी 20 मालिकेत प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे गंभीर न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त होता. आता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान, या टी 20 मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज रमणदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाक यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीत.
उभय संघातील कामगिरीचा लेखाजोखा
वेस्ट इंडिजमध्ये यंदाच्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने द.आफ्रिकेला नमवत जेतेपद पटकावले होते. यानंतर दोन्ही संघ आता टी 20 मालिकेत आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 27 टी 20 सामने खेळवले गेले आहेत. भारताने 15 सामने जिंकले असून तर द. आफ्रिकेने 11 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघांमधील केवळ एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. उभय संघातील आतापर्यंतचा टी 20 सामन्यातील इतिहास पाहता टीम इंडिया कायमचं एक पाऊल पुढे राहिली आहे.
द.आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
भारत व द.आफ्रिका टी 20 मालिकेचे वेळापत्रक
8 नोव्हेंबर पहिला टी 20 सामना - डर्बन रात्री 8 वा
10 नोव्हेंबर दुसरा टी 20 सामना - गकेबेहरा रात्री 8 वा
13 नोव्हेंबर तिसरा टी 20 सामना - सेंच्युरियन रात्री 8 वा
15 नोव्हेंबर चौथा टी 20 सामना - जोहान्सबर्ग रात्री 8 वा.
थेट प्रक्षेपण - स्पोर्ट्स 18, जिओ सिनेमा.