मैं, कही नही जा रहा हूं!
वनडेतील निवृत्तीच्या अफवांवर रोहित शर्माने सोडले मौन : संघसहकाऱ्यांवर केला कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीच्या अफवांवर स्पष्ट उत्तर दिले आणि या अफवांवर पूर्णविराम लावला. मी कुठेही जात नाही. मी वनडेतून निवृत्त होत नाही. यामुळे अफवा पसरवू नका, असे स्पष्ट सांगत त्याने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
या स्पर्धेच्या आधी अशी चर्चा होती की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला निरोप देऊ शकतो. भारताच्या विजयानंतर, रोहितला सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याच्या भविष्याबाबत विचारण्यात आले. सुरुवातीला या स्टार फलंदाजाने हसून प्रश्न सोडला आणि पुढे म्हणाला, “भविष्यात काही वेगळे प्लॅन नाहीत, जे जसं आहे तसंच सुरूच राहणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्त होत नाहीये. मी हे सांगतोय जेणेकरून पुढे कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत.‘
अंतिम सामन्यात धमाकेदार खेळी
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात रोहितने 76 धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. आपल्या खेळीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, संघाच्या गरजेनुसार आपला खेळ बदलला आणि आक्रमक शैली स्वीकारली, जी त्याची नैसर्गिक शैली नाही. मला अशी फलंदाजी करायची होती. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करता तेव्हा तुम्हाला संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षांपासून मी वेगळ्या शैलीत खेळत आहे. आम्हाला आता निकाल मिळत आहेत.
केएल-हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव
फायनलमध्ये बाजी मारल्यानंतर रोहितने सर्वांचे आभार मानले. हे आमचे घरचे मैदान नाही, पण येथील माहोल प्रेक्षकांनी घरच्या मैदानासारखा केला, अशा शब्दांत त्याने चाहत्यांचे आभार मानले. लोकेश राहुल हा शांत डोक्याने खेळतो. दबावात तो त्रस्त होत नाही. तो परिस्थितीनुसार खेळतो. त्याच्यामुळे हार्दिकसारख्या खेळाडूंना आक्रमक खेळणे सहज सोपे होते, असे रोहितने म्हटले आहे.
रविंद्र जडेजाने निवृत्तीचा विषय एका वाक्यात संपवला
विराट कोहलीने आर. अश्विनला मिठी मारली आणि त्याने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर विराट कोहलीने स्टीव्हन स्मिथला मिठी मारली, त्यानंतर स्मिथने निवृत्ती जाहीर केली. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जेव्हा रवींद्र जडेजाने आपली दहा षटके पूर्ण केली त्यानंतर विराटने रवींद्र जडेजाला मिठी मारल्याचे सर्वांनी पाहिले होते. त्यामुळे जडेजा आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर निवृत्ती घेणार, असे सर्वांना वाटले होते. याबाबत माध्यमात जोरदार चर्चाही सुरु होती. पण आता जडेजाने याबाबत एक मोठं भाष्य केले आहे. दरम्यान, जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्व विषयच बंद केला आहे. अनावश्यक कोणतीही अफवा पसरवू नका, धन्यवाद... जडेजाने ही पोस्ट करत आता आपल्या निवृत्तीच्या विषयाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर सुनील गावसकरांचे हटके सेलिब्रेशन
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 9 महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघ एकीकडे ट्रॉफी स्वीकारत जल्लोष करत होता. तर दुसरीकडे सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी उपस्थित असलेले सुनील गावस्कर लहान मुलांसारखे नाचताना दिसले. सुनील गावसकरांचा हा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये सुनील गावसकर यांच्याबरोबर अँकर मयंती लँगर आणि भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पादेखील उपस्थित होते.
आयकॉनिक व्हाईट जॅकेट अन् टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन
दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपद पटकावले. अर्थात, भारतीय संघाचे हे विक्रमी तिसऱ्यांदा जेतेपद आहे. यादरम्यान, 25 वर्षाचा हिशोब चुकता करत टीम इंडियाने 12 वर्षानंतर म्हणजेच 2013 नंतर आयकॉनिक व्हाईट जॅकेटमध्ये मिरवण्याचा क्षण अनुभवला. विक्रमी तिसऱ्या जेतेपदानंतर कॅप्टन रोहित शर्माचा अंदाज, विराट कोहलीचा बाज अन् हार्दिक पंड्याच्या सेलिब्रेशन स्वॅगसह टीम इंडियातील ट्रॉफी उचलल्यानंतरचे सेलिब्रेशन सगळच अगदी जस्ट लुकिंग लाइक अ वॉव सीन दाखवणारे होते. फायनलमध्ये बाजी मारल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना मेडल आणि आयकॉनिक जॅकेटसह सन्मानित करण्यात आले. आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते ट्रॉफी घेतल्यावर व्यासपीठावर संघातील खेळाडू एकत्र आले अन् त्यांनी खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पहायला मिळाले.
यजमान पाकिस्तान, पण रुबाब टीम इंडियाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर हायब्रिड मॉडेलनुसार भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत घेण्याचा निर्णय झाला. गत हंगामात भारतीय संघाला नमवल्याचा आनंद साजरा करणारा पाकिस्तानचा संघ यंदाच्या स्पर्धेंत साखळी फेरीतच गारद झाला. विशेष म्हणजे, टीम इंडियाने पाकला साखळी फेरीतच गारद केले अन् दिमाखात फायनल गाठत टॉफी पाकिस्तानमधून दुबईत आणण्यास भाग पाडले. यानंतर दुबईत न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. यामुळे संपूर्ण स्पर्धेत यजमान पाकिस्तान मात्र रुबाब भारतीयांचा असे दिसून आले.
संघ सुरक्षित हातात आहे : विराट कोहली
सामन्यानंतर विराट म्हणाला की जेव्हा तो आणि इतर मोठे खेळाडू संघ सोडतील तेव्हा त्यांना खात्री होईल की भारतीय संघ सुरक्षित हातात आहे. आमच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा विजय शक्य झाला आहे. मी संघातील इतर तरुण खेळाडूंशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझे अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सांगतो की मी इतके दिवस कसे खेळलो. जेव्हा आपण क्रिकेट सोडतो तेव्हा तुम्हाला चांगल्या स्थितीत जायचे असते. गिल, श्रेयस, राहुल या सर्वांनीच अशा प्रभावी खेळी केल्या आहेत. संघ निश्चितच युवा खेळाडूंच्या हाती सुरक्षित आहे, असे विराट यावेळी पुढे म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील जेतेपद हे सांघिक आहे. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूचे यात मोलाचे योगदान आहे. तसेच दुबईत भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांचे खूप खूप आभार. जेव्हा चाहते संघाला पाठिंबा देतात तेव्हा खूप मोठा फरक पडतो.
रोहित शर्मा, भारतीय कर्णधार
शेवटी, आम्ही जेव्हा निवृत्त होऊ, तेव्हा आमचा संघ असा असेल जो जगातील प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असेल, जो पुढील 8-10 वर्षे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार असेल. या युवा खेळाडूंकडे ती क्षमता आहे.
विराट कोहली, भारताचा दिग्गज फलंदाज