For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा पावसाने केला गेम

06:58 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा पावसाने केला गेम
Advertisement

पावसाच्या व्यत्यय आलेल्या पहिल्याच वनडेत भारत 7 विकेट्सनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात ही पराभवाने झाली आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 26-26 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 136 धावापर्यंत मजल मारता आली. यानंतर कांगारुंनी विजयी लक्ष्य 3 गड्यांच्या मोबदल्यात पार करत विजयाला गवसणी घातली. उभय संघातील दुसरा सामना दि. 23 रोजी अॅडलेडमध्ये खेळवला जाईल.

Advertisement

पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर, ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणे पडले आणि कर्णधार मिचेल मार्शने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कठीण परिस्थितीत, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले होते, परंतु दोघांचीही कामगिरी निराशाजनक ठरली. रोहितने केवळ 8 धावा केल्या, तर विराटला खातेही उघडता आले नाही. शुभमन गिलही फक्त 10 धावांवर माघारी फिरला. श्रेयस अय्यरही अपयशी ठरला. त्याला 11 धावा करता आल्या.

के. एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलने 31 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 38 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावांचे योगदान दिले. याशिवाय, नितीश कुमार रे•ाrने नाबाद 19 धावा केल्या. इतर फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे टीम इंडियाला 26 षटकांत 9 बाद 136 धावापर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूड, ओवेन आणि कुहनेमन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर मिचेल स्टार्क आणि एलिस यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा सहज विजय

दरम्यान, या सामन्यात पावसाचा सातत्याने व्यत्यय आला. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य दिले गेले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्शने आक्रमक सुरुवात करुन दिली. त्याने दमदार फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला. मार्शने 52 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. मार्शव्यतिरिक्त जोश फिलिपने 37 तर मॅट रेनशॉने नाबाद 21 धावा जोडल्या. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी प्रत्येकी आठ धावा केल्या. या जोरावर कांगारुंनी विजयी टार्गेट 21.1 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

भारत 26 षटकांत 9 बाद 136 (रोहित शर्मा 8, शुभमन गिल 10, श्रेयस अय्यर 11, अक्षर पटेल 31, केएल राहुल 38, नितीश कुमार रे•ाr नाबाद 19, हेजलवूड, मिचेल ओवेन आणि कुहनेमन प्रत्येकी 2 बळी)

ऑस्ट्रेलिया 21.1 षटकांत 3 बाद 131 (मिचेल मार्श नाबाद 46, ट्रेव्हिस हेड 8, मॅथ्यू शॉर्ट 8, जोस फिलिप 37, रेनशॉ नाबाद 21, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी).

 रोहित, विराटचा फ्लॉप शो

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पहिला वनडे सामना माजी कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास होता, कारण हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. पण 500 व्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पर्थच्या वेगवान उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर रोहित अवघ्या 8 धावा करत माघारी परतला. हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.

दरम्यान, विराट कोहलीसाठी देखील हा सामना अतिशय खास होता. कारण विराट देखील 8 महिन्यांनंतर पुनरागमन करत होता. पण विराटला खाते देखील उघडता आले नाही. तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. विराटृ-रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण दोघेही स्वस्तात माघारी परतल्यानंतर चाहते निराश झाले.

वनडेत मार्शचे 100 षटकार

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने भारताविरुद्ध तीन षटकार मारले आणि यासह एकदिवसीय सामन्यात 100 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने केला. तो ऑस्ट्रेलियासाठी 100 षटकार मारणारा आठवा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर 159 षटकारांसह सर्वाधिक एकदिवसीय षटकार मारण्याचा विक्रम आहे.

2025 मध्ये टीम इंडियाचा वनडेत पहिलाच पराभव

2025 मध्ये, भारताला पहिला एकदिवसीय पराभव पत्करावा लागला. संघाने वर्षाची सुरुवात इंग्लंडला तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये हरवून केली. त्यानंतर त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग पाच सामने जिंकून ट्रॉफी उंचावली. आता, त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना गमावावा लागला.

Advertisement
Tags :

.