टीम इंडियाच्या गब्बरचा क्रिकेटला अलविदा
शिखर धवनने भावनिक व्हिडिओ शेअर करत जाहीर केली निवृत्ती : टीम इंडियातील सहकाऱ्यांचे मानले आभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने देशातर्फे शेवटचे खेळल्यानंतर दोन वर्षांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिन्ही प्रकारांत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली असल्याने आपण समाधानी आहोत, असे ही घोषणा करताना त्याने सांगितले.
या 38 वर्षीय खेळाडूने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्याचा भारतातर्फे शेवटचा सामना 2022 मध्ये बांगलादेशविऊद्ध 50 षटकांचा होता. ‘मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय बंद करत असताना माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता आहे. जे प्रेम आणि समर्थन दिले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद’, असे धवनने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिखरावर असताना दिल्लीच्या फलंदाजाची फटकेबाजी आणि जोरदार आक्रमण करण्याची क्षमता पाहण्यासारखी होती. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक 363 धावा काढून तो स्पर्धावीर ठरला होता. ‘आयपीएल’च्या दिग्गज खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. सदर स्पर्धेत धवनने 222 सामने खेळून 6769 धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश राहिला. त्याचे ‘आयपीएल’मधील 768 चौकार हे कोणत्याही फलंदाजाने फटकावलेले सर्वाधिक चौकार असून या स्पर्धेत सलग शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरण्याचा मानही त्याने आपल्या नावावर जमा केलेला आहे. 2016 च्या मोसमात ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा शिखर धवन भाग होता. तो दिल्ली, मुंबई आणि पंजाबकडूनही खेळला. कारकिर्दीच्या विविध टप्प्यांवर दिल्ली आणि पंजाबचे त्याने नेतृत्व केले. यंदाच्या मोसमात तो पंजाबतर्फे खेळताना दिसला होता. पण फिटनेसच्या समस्येमुळे तो फक्त पाचच सामने खेळू शकला.
‘गब्बर’ कारकीर्द
धवन भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय सामने व 68 टी-20 सामने खेळला. परंतु गेल्या काही वर्षांत तो खराब फॉर्ममुळे आणि यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यासारख्या तऊण सलामीवीरांचा उदय झाल्यामुळे संघाबाहेर पडला होता. 50 षटकांच्या प्रकारात त्याने 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या, ज्यात 17 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2315 कसोटी धावा 40.61 सरासरीने जमविल्या व त्यात सात शतकांचा समावेश आहे.
धवनचा अचानक निवृत्तीचा निर्णय
धवन बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता, पण शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल या युवा सलामीवीरांच्या आगमनाने त्याचे पुनरागमन कठीण झाले होते. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाला आगामी आयसीसी स्पर्धा लक्षात घेऊन युवा खेळाडूंना तयार करायचे आहे. यामुळेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धवनला माहित होते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी क्वचितच शक्य आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळत नव्हता आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी त्याची कामगिरी काही खास नव्हती. यामुळेच शिखर धवनने आपली बॅट मॅन करण्याचा निर्णय घेतला.
धवनची विक्रमी कामगिरी
- पदार्पणाच्या कसोटीत वेगवान शतकाचा विक्रम - धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. इतकेच नाही तर कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. गब्बरने अवघ्या 85 चेंडूत शतक झळकावले होते.
- मिस्टर आयसीसी - ‘गब्बर’ने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. त्याने 2013 आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोल्डन बॅट जिंकली होती. धवन हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने अवघ्या 10 सामन्यांमध्ये 701 धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयसीसीच्या अनेक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याला मिस्टर आयसीसी हे टोपण नाव मिळाले.
- 100 व्या वनडे सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय - आपल्या 100 व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन हा पहिला भारतीय फलंदाज आहे. 2018 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
“आयुष्यात पुढे जाण्यासाठी पान उलटणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देताना मी इतके दिवस खेळलो याचे मला समाधान वाटते”
- शिखर धवन
बधाई हो शिखी. मोहालीमध्ये तू माझी जागा घेतलीस. तेव्हापासून तू मागे वळून पाहिले नाहीस आणि गेल्या काही वर्षांत काही उत्कृष्ट कामगिरी केल्या. तू मजेत राहा आणि आयुष्य भरभरून जग. खूप खूप शुभेच्छा.
- वीरेंद्र सेहवाग
शिखीचे शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन. मला माहीत आहे की, तू भविष्यात जे काही हाती घेशील त्यातून आनंद पसरवेल.
- गौतम गंभीर
शिखरबद्दल मला जी गोष्ट आवडली ती म्हणजे तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तर होताच, शिवाय तो दयाळू आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक गोष्टींकडे पाहणारा आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण