आशिया चषक हॉकीत टीम इंडियाचा चौथा विजय
मलेशियाला 4-1 ने नमवले : मनप्रीत, सुखजीत, शिलानंद, विवेकचा प्रत्येकी एक गोल : पुढील लढतीत चीनचे आव्हान
वृत्तसंस्था/राजगीर (बिहार)
आशिया चषक हॉकी स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम ठेवताना भारतीय हॉकी संघाने आपला चौथा विजय मिळवला. गुरुवारी झालेल्या सुपर-4 लढतीत भारताने मलेशियाला 4-1 असे पराभूत केले. या विजयासह भारतीय संघ पुन्हा अव्वलस्थानी आला आहे. आता, सुपर-4 मधील भारताचा शेवटचा सामना दि. 6 रोजी चीनशी होईल. साखळी फेरीत लागोपाठ तीन विजय मिळवल्यानंतर सुपर-4 मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाशी झाला. कोरियाविरुद्ध शानदार प्रदर्शनानंतरही भारतीय संघाला 2-2 असे बरोबरीत समाधान मानावे लागले. यानंतर गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने मलेशियाविरुद्ध जोरदार खेळ केला. सुरुवातीला मलेशियाने सामन्यातील पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवला. शफीक हसनने हा गोल करत संघाला 1-0 असे आघाडीवर नेले. यानंतर दुसऱ्या सत्रात 17 व्या मिनिटाला मनप्रीत सिंगने गोल करत भारतीय संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
पिछाडीवरुन आघाडी
मनप्रीतच्या शानदार गोलनंतर पुढील सात मिनिटात भारताने दोन गोल केले. 19 व्या मिनिटाला सुखजीत सिंगने तर 24 व्या मिनिटाला शिलानंद लाक्राने गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. तिसऱ्या सत्रातही भारताचा दबदबा राहिला. विवेक सागर प्रसादने 38 व्या मिनिटाला गोल करताना भारतीय संघाला 4-1 असे आघाडीवर नेले. मलेशियन संघाने तिसऱ्या व चौथ्या सत्रात गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. भारताने ही आघाडी कायम ठेवत सामना 4-1 अशा फरकाने जिंकला. कोरियाविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मलेशियाविरुद्ध मात्र आक्रमक खेळत दणकेबाज विजयाला गवसणी घातली.
चीनने कोरियाला नमवले
आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सुपर-4 मधील अन्य एका लढतीत चीनने बलाढ्या दक्षिण कोरियाचा 3-0 ने धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या सामन्यात चीनने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवताना कोरियन संघाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. बुधवारी झालेल्या सामन्यात कोरियाने भारतीय संघाला बरोबरीत रोखले होते, पण यानंतर गुरुवारी झालेल्या लढतीत कोरियन संघ चीनविरुद्ध सामन्यात सपशेल अपयशी ठरला. या पराभवामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. आज, कोरियाचा सामना मलेशियाविरुद्ध होईल.