टीम इंडियाचा सलग चौथ्या संडेला ब्लॉकबस्टर शो
आयसीसी महिला वनडे विश्वचषक : भारतीय महिलांचा पाकवर दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ कोलंबो
येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानचा 88 धावांनी धुव्वा उडवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाकचा संघ 159 धावांत ऑलआऊट झाला. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय असून गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 20 धावांत 3 बळी घेत विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांती गौडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकली नाही आणि 23 धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्याने भारताच्या धावांची गती कमी झाली. त्यानंतर प्रतिका रावल 31 धावा करत बाद झाली. हरलीन देओलने काही शानदार फटके खेळले पण ती 46 धावा करुन माघारी परतली. दीप्ती शर्मानेही चांगली सुरुवात केली, पण ती 25 धावांवर बाद झाली. स्नेह राणाने देखील चांगले फटके खेळले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने 20 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी करत भारताला 247 धावांपर्यंत पोहोचवले.
पाकचा संघ 159 धावांत ऑलआऊट
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि 26 धावांत त्यांनी तीन विकेट गमावल्या. यानंतर, सिद्रा अमीनने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण दुस्रया टोकाकडून ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने पाकचा संघ 159 धावांत ऑलआऊट झाला. सिद्रा अमीनने सर्वाधिक 106 चेंडूत 81 धावांचे योगदान दिले. दरम्यान, आठ पाकिस्तानी खेळाडूंना डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. स्नेह राणाने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 50 षटकांत सर्वबाद 247 (हरलीन देओल 46, जेमिमा रॉड्रिग्ज 32, स्नेह राणा 20, रिचा घोष नाबाद 35, दियाना बेग 4 बळी)
पाकिस्तान महिला संघ 43 षटकांत सर्वबाद 159 (सिदरा अमीन 81, नतालिया परवेज 33, दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड प्रत्येकी 3 बळी).
सलग चौथ्या संडेला ब्लॉकबस्टर शो
आशिया कप स्पर्धेपासून सलग चौथ्या रविवारी भारत-पाक यांच्यातील लढत पहायला मिळाली. क्रिकेटमधील हा सलग चौथा रविवार आहे, जेव्हा भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. याआधी टीम इंडियाने 14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पुरुषांच्या आशिया कपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले होते.