महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टीम इंडियाचा सर्वात मोठा कसोटीविजय

06:58 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 434 धावांनी मात : साहेबांना 122 धावांवर गुंडाळले : यशस्वी जैस्वालचे नाबाद द्विशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

यशस्वी जैस्वालचे नाबाद द्विशतक, रवींद्र जडेजाची (112 धावा व 41 धावांत 5 बळी) अष्टपैलू कामगिरी व सर्फराज खानच्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर तब्बल 434 धावांनी प्रचंड विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. धावांच्या फरकाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील चौथा सामना दि. 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

राजकोट कसोटीत भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजाने शतकी खेळी केली होती. यानंतर बेन डकेटच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांत संपला व भारताला 126 धावांची महत्वाची आघाडी मिळाली. त्यानंतर यशस्वी जैस्वालचे नाबाद द्विशतक, शुभमन गिलच्या 91 धावा व पदार्पणवीर सर्फराज खानच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने आपला दुसरा डाव 4 बाद 430 धावांवर घोषित केला व इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जडेजाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लिश संघाने सपशेल नांगी टाकली. त्यांचा डाव अवघ्या 122 धावांवर आटोपला. इंग्लंडचा हा कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 112 धावांची खेळी व दोन्ही डावात सात बळी घेणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी

सामन्याच्या चौथ्या दिवशी 2 बाद 196 धावसंख्येवरुन भारताने पुढे खेळायला सुरुवात केली. शुभमन गिल व कुलदीपने भारताच्या डावाला आकार दिला. गिलने चौथ्या दिवशीही आपल्या शैलीतच फलंदाजी केली. गिल 91 धावांवर धावबाद झाल्याने 9 धावांनी त्याचे शतक हुकले. या खेळीत त्याने 9 चौकार व 2 षटकार लगावले. गिल परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल मैदानात आला. तिसऱ्या दिवशी जैस्वालने शानदार शतक ठोकले होते पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. चौथ्या दिवशी तो पुन्हा मैदानात आला आणि टीम इंडियासाठी अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. जैस्वालने कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावताना 236 चेंडूत 14 चौकार व 12 षटकारासह नाबाद 214 धावा केल्या. दुसरीकडे, सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी करत यशस्वीला चांगली साथ दिली. दोघांनीही झटपट धावा काढल्या. सर्फराजने लागोपाठ दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले. त्याने 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. जैस्वालच्या द्विशतकानंतर भारताने आपला दुसरा डाव 98 षटकांत 4 बाद 430 धावांवर घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे अशक्यप्राय असे आव्हान दिले.

जडेजा, कुलदीपसमोर साहेबांचे लोटांगण

विजयासाठी 557 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव 40 षटकांत 122 धावांत आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातीलाच 4 बाद 28 अशी दैना झाली होती. त्यानंतर जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जडेजाने रुटला पायचीत केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर इंग्लंडचा डाव स्थिरावला नाही. तळाचा खेळाडू मार्क वूडने सर्वाधिक 33 धावा केल्या. स्टोक्सने 15 तर बेन फोक्सने 16 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करताना 41 धावांत 5 बळी घेतले. याशिवाय, कुलदीप यादवने 2, बुमराह व अश्विन यांनी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव 445 व दुसरा डाव 98 षटकांत 4 बाद 430 घोषित (यशस्वी जैस्वाल नाबाद 214, रोहित शर्मा 19, कुलदीप यादव 27, शुभमन गिल 91, सर्फराज खान नाबाद 68, रुट, हार्टले, अहमद एकेक बळी) इंग्लंड प.डाव 319 व दुसरा डाव 40 षटकांत सर्वबाद 122 (स्टोक्स 15, अहमद 16, मार्क वूड 33, जडेजा 5 तर कुलदीप 2 बळी).

कसोटीमध्ये धावांच्या फरकाने भारताचा मोठा विजय

राजकोटी येथील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने साहेबांचा तब्बल 434 धावांनी पराभव केला. कसोटी इतिहासातील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी डिसेंबर 2021 मध्ये भारताचा सर्वात मोठा विजय झाला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता.

धावांच्या बाबतीत भारताचे सर्वात मोठे कसोटी विजय

  1. 434 वि. इंग्लंड, राजकोट 2024
  2. 372 वि. न्यूझीलंड, मुंबई 2021
  3. 337 वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली 2015
  4. 321 वि. न्यूझीलंड, इंदोर 2016
  5. 320 वि. ऑस्ट्रेलिया, मोहाली 2008.

यशस्वी जैस्वालची विक्रमांची रांग

  1. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत 24 वर्षीय जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले. यासह सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी विराटने 2017-18 मध्ये, विनोद कांबळीने 1992-93 मध्ये ही कामगिरी केली होती.
  2. जैस्वालने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात 214 धावांची खेळी खेळली. त्याने 234 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकार मारले. या सामन्यातून जैस्वालने एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. अक्रमने 1996-97 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत 257 धावांच्या खेळीत 12 षटकार मारले होते.
  3. जैस्वालने एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या कसोटी मालिकेत त्याने कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत 19 षटकार मारले होते, मात्र आता यशस्वीने 20 षटकार मारुन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पदार्पणवीर सर्फराजचाही अनोखा विक्रम

मुंबईचा युवा खेळाडू सर्फराज खानने पहिल्याच कसोटीत दोन अर्धशतके झळकावत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. सर्फराजने कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावांत पन्नासहून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. या यादीत दिलवर हुसेन पहिल्या क्रमांकावर आहे. दिलवर हुसेनने पदार्पणाच्या कसोटीतच ही कामगिरी केली होती. यानंतर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नासहून अधिक धावा केल्या. याशिवाय, श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय फलंदाज आहे, ज्याने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा आकडा पार केला. आता या यादीत सर्फराज खानचा समावेश झाला आहे.

कसोटी इतिहासात इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून या मालिकेतील तिसऱ्या कसोटी भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, धावांच्या बाबतीत इंग्लंडचा 1934 नंतर कसोटी इतिहासातील हा सर्वात मोठा दारुण पराभव आहे.

इंग्लंडचा सर्वात मोठे कसोटी पराभव

  1. 562 वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल 1934
  2. 434 वि. इंडिया राजकोट, 2024
  3. 425 वि. वेस्ट इंडिज, मँचेस्टर 1976

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article