टीम इंडियाचा ‘सुंदर’ विजय
तिसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडियाची मालिकेत बरोबरी
वृत्तसंस्था/ होबार्ट
येथील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 9 चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य गाठले. या विजयासह भारत हा बेलेरिव्ह मैदानावर टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला देश ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 49 धावांची विजयी खेळी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील चौथा सामना दि. 6 रोजी कॅरा येथे होईल.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीच्या तीन षटकांतच दोन धक्के बसले. अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्या दोन षटकांत ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस यांना बाद केले. हेड 6 तर इंग्लिस केवळ 1 धाव करून माघारी परतला. यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. ही जोडी वरुण चक्रवर्तीने मोडली केली. नवव्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले. दुसऱ्या चेंडूवर मार्श तिलक वर्माच्या हातून झेलबाद झाला. तो फक्त 11 धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर वरुणने मिचेल ओवेनला बोल्ड केले, ओवेनला भोपळाही फोडता आला नाही.
डेव्हिड, स्टॉयनिसचा अर्धशतकी धमाका
दरम्यान, टिम डेव्हिडने मात्र दमदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 38 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 74 धावांचे योगदान दिले. त्याला शिवम दुबेने बाद केले. यानंतर स्टॉयनिसने मॅथ्यू शॉर्टसोबत सहाव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. त्याने 39 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा फटकावल्या. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला 6 बाद 186 धावापर्यंत मजल मारता आली. मॅथ्यू शॉर्ट 15 चेंडूत 26 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून अर्शदीपने प्रभावी गोलंदाजी करताना सर्वाधिक 35 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
वॉशिंग्टनची सुंदर खेळी
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्मा दमदार फॉर्ममध्ये दिसला, मात्र तो खेळपट्टीवर फार काळ टिकला नाही. अभिषेकने 16 चेंडूत 25 धावा (2 चौकार, 2 षटकार) करताना नॅथन एलिसकडे आपले विकेट गमावले. त्यानंतर एलिसने शुभमन गिललाही (15 धावा) माघारी पाठवले. कर्णधार सूर्यकुमार यादव (24 धावा) लयीत दिसत होता, पण त्यानेही आपली विकेट लवकर गमावली. यानंतर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाला शंभरी गाठून दिली. या जमलेल्या जोडीला एलिसने धक्का दिला. त्याने अक्षर पटेलला 17 धावांवर माघारी पाठवले. अक्षर बाद झाल्यानंतर . वॉशिंग्टन सुंदरने संधीच सोने करताना 23 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत खास नजराणा पेश केला. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयी टार्गेट 18.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. त्याला जितेश शर्माने 3 चौकारासह नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 186 (टीम डेव्हिड 74, मार्क स्टॉयनिस 64, मॅथ्यू शॉर्ट नाबाद 26, मिचेल मार्श 11, अर्शदीप सिंग 3 बळी, वरुण चक्रवर्ती 2 बळी, शिवम दुबे 1 बळी)
भारत 18.3 षटकांत 5 बाद 188 (अभिषेक शर्मा 25, शुभमन गिल 15, सूर्यकुमार यादव 24, तिलक वर्मा 29, अक्षर पटेल 17, सुंदर नाबाद 49, जितेश शर्मा नाबाद 22, एलिस 3 बळी, स्टॉयनिस 1 बळी).
अभिषेकचा आणखी एक कारनामा
25 वर्षीय अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतीय टी 20 संघाचा प्रमुख फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात 25 धावांची खेळी साकारली. या खेळीसह तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका वर्षात 700 धावा करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. हा विक्रम प्रस्थापित करताना त्याने भारताचा रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीला मागे टाकले आहे. धवनने 2018 मध्ये 689 धावा काढल्या होत्या तर रोहित शर्माने 2022 मध्ये 649 धावा केल्या होत्या.