रांचीत शेवटच्या षटकांत टीम इंडियाचा विजय
विराट-रोहित चमकले पण आफ्रिकेने विजयासाठी फोडला घाम : भारत 17 धावांनी विजयी
वृत्तसंस्था/ रांची
रांचीमध्ये झालेल्या पहिल्या हायस्कोरिंग वनडे सामन्यात टीम इंडियाने 17 धावांनी निसटता विजय मिळवला. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने कडवी झुंज दिली, पण विजय मात्र भारतीय संघाने आपल्या नावे केला. द. आफ्रिकेला अखेरच्या षटकात 18 धावांची गरज होती. अर्धशतक झळकावलेला कार्बिन बॉश फलंदाजी करत होता, तर प्रसिध अखेरच्या षटकात गोलंदाजीला आला आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. यासह द. आफ्रिका 332 धावांवर सर्वबाद झाली आणि भारताने 17 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 3 डिसेंबर रोजी रायपूर येथे होईल.
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 350 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 11 धावांतच त्यांनी तीन विकेट गमावल्या होत्या. कर्णधार मॅरक्रम 7 धावा करुन माघारी परतला तर रिकेल्टन आणि डिकॉक यांना भोपळाही फोडता आला नाही. यानंतर टॉनी डी झोर्जीने 39 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ब्रेविसने 37 धावांचे योगदान दिले. त्याचा अडथळा हर्षित राणाने दूर केला.
आफ्रिकेचा कडवा प्रतिकार
यानंतर मॅथ्यू ब्रिट्झके व मार्को जॅन्सेन यांनी 97 धावांची भागीदारी रचत सामना द. आफ्रिकेच्या बाजूने वळवला. पण, कुलदीप यादवने 34 व्या षटकात या दोघांनाही माघारी धाडले. पहिल्याच चेंडूवर जॅन्सेन मोठा फटका खेळताना बाद झाला, तर तिसऱ्या चेंडूवर ब्रिटझकेने तीच चूक करत विकेट गमावली. ब्रिट्झकेने 80 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 72 धावांची खेळी केली. तर मार्को जॅन्सेनने 39 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांची वादळी खेळी केली होती. यानंतर कार्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. बॉशने 41 चेंडूत अर्धशतक झळकावले. कार्बिन बॉश अर्धशतक करत मैदानात कायम होता. अखेरच्या षटकात 18 धावांची गरज असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होण्यापूर्वी त्याने 51 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. पण, तो बाद झाला आणि आफ्रिकेचा डाव 49.2 षटकांत 332 धावां संपला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 तर हर्षित राणाने 3 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
भारताचा साडे तीनशेचा धावांचा डोंगर
येथील झारखंड क्रिकेट असोशिएनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. जैस्वालने आक्रमक सुरुवात केली, पण तो 2 चौकार आणि 1 षटकारासह 18 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरताना मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सुरुवातीला रोहितला 2 धावांवर असताना झेल सुटल्याने जीवदान मिळाले होते. याचा त्याने चांगला फायदा घेतला.
रोहितची अर्धशतकी खेळी
रोहित सुरुवातीला संयमी खेळत होता, पण नंतर त्याने आक्रमक खेळ केला. विराट कोहलीने सुरुवातच आक्रमक केली. हीच गती त्याने शेवटपर्यंत कायम ठेवली. विराटने षटकारासह अर्धशतक केले. नंतर रोहितनेही त्याचे अर्धशतक केले. त्याने 51 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारासह 57 धावांची शानदार खेळी साकारली. 57 धावांवर मात्र त्याला मार्को जॅन्सेनन 22 व्या षटकात पायचीत केले. दरम्यान, विराट आणि रोहित यांच्या दुसऱ्या गड्यासाठी 136 धावांची भागीदारी केली.
विराटचा शतकी तडाखा
रोहित बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेला ऋतुराज स्वस्तात बाद झाला. त्याला केवळ 8 धावा करता आल्या. ऋतुराजनंतर वॉशिंग्टन सुंदरही 13 धावांवर माघारी परतला. यानंतर विराटला केएल राहुलची चांगली साथ मिळाली. या दोघांनी आधी डाव सावरला आणि संघाला तीनशेपार नेले. यादरम्यान विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक साजरे केले. शतकानंतर त्याने पुन्हा गती वाढवली. 39 व्या षटकात प्रनेलन सुब्रयनविरुद्ध विराटने सलग चार चेंडूवर 4,6,6,4 अशा धावा ठोकल्या. अखेर 43 व्या षटकांत नांद्रे बर्गरने त्याला बाद करत आफ्रिकेला यश मिळवून दिले. विराटने 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावांची खेळी केली. विराट आणि केएल राहुल यांच्यात 76 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलनेही आक्रमक खेळताना आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी रवींद्र जडेजाने केएलला चांगली साथ दिली. या दोघांतही अर्धशतकी भागीदारी झाली. केएलने 56 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारासह 60 धावांचे योगदान दिले. तर जडेजाने 20 चेंडूत 32 धावा जोडल्या. शेवटच्या षटकात कॉर्बिन बोशने सलग दोन चेंडूवर रवींद्र जडेजा आणि अर्शदीप सिंग यांना बाद केले. अर्शदीपला भोपळाही फोडता आला नाही. शेवटी हर्षित राणा 3 धावांवर आणि कुलदीप शून्यावर नाबाद राहिले. टीम इंडियाने 50 षटकात 8 बाद 349 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
भारत 50 षटकांत 8 बाद 349 (यशस्वी जैस्वाल 18, रोहित शर्मा 51 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारासह 57, विराट कोहली 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारासह 135, ऋतुराज गायकवाड 8, वॉशिंग्टन सुंदर 13, केएल राहुल 60, रविंद्र जडेजा 32, मार्को जॅन्सेन, बर्गर, बार्टमन आणि बोश प्रत्येकी 2 बळी).
दक्षिण आफ्रिका 49.2 षटकांत सर्वबाद 332 (मॅरक्रम 7, रिकेल्टन 0, डिकॉक 0, ब्रीजटेक 72, टोनी डी जोर्जी 39, मार्को जॅन्सेन 70, बोश 67, कुलदीप यादव 4 बळी, हर्षित राणा 3 बळी, अर्शदीप 2 तर प्रसिध कृष्णा 1 बळी).
वनडेचा सिक्सर किंग हिटमॅन
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित शर्माने हिट शो दाखवताना आपणच सिक्सर किंग असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो नवा षटकारांचा बादशाह ठरला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला (351 षटकार) मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. रोहितने आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 352 षटकार लगावले आहेत. आफ्रिदीचा हा विक्रम गेल्या 10 वर्षांपासून कायम होता, जो आता रोहित शर्माने मोडला आहे.
वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा - 352
शाहिद आफ्रिदी - 351
ख्रिस गेल - 331
महेंद्रसिंह धोनी -229
वनडेतील सेंच्युरी किंग
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीसाठी तो दौरा काही खास ठरला नव्हता. पण रांचीतील स्टेडियमवर मात्र विराटने अनोख्या शैलीत शतक झळकावले. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत त्याने 135 धावांची क्लासिक खेळी साकारली. या शतकी खेळीसह विराटने वनडेतील 52 वे तर एकूण कारकिर्दीतील 83 वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. वनडेतील 52 शतकांशिवाय कसोटीत त्याने 30 शतके झळकावली आहेत. टी-20 क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यात एका शतकाची नोंद आहे. विशेष म्हणजे, आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली (83) शतकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वनडेत सर्वाधिक शतक झळकवणारे फलंदाज
वनडेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय आहेत. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरशिवाय रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली. - 52 शतके
सचिन तेंडुलकर - 51 शतके
रोहित शर्मा - 33 शतके
रिकी पाँटिंग -30 शतके
सनथ जयसूर्या - 28 शतके...
शतकाचे सेलिब्रेशनही हटकेच
विराटने रांची वनडेत अफलातून फलंदाजी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक झळकावले. तब्बल नऊ महिन्यांनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेले हे शतक त्यामुळे अधिक खास ठरले. स्वत: विराटने तर या शतकाचा आनंद लुटलाच, पण टीम इंडियाच्या खेळाडूंनीही त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचा जबरदस्त जल्लोष केला. शतकानंतर विराटने उंच उडी मारून आक्रमक अंदाजात बॅट उंचावली. अनेक दिवसांनी विराटचा असा अवतार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने गळ्यातील अंगठीला किस केला आणि हात जोडून देवाचे आभार मानले.
- द.आफ्रिकेविरुद्ध सहावे शतक
2.वनडेत 52 शतके झळकावणारा एकमेवद्वितीय फलंदाज
3.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा फलंदाज
- मायदेशात सर्वाधिक 59 वेळा 50 हून अधिक धावा