सराव सामन्यात टीम इंडियाचा विजय
पीएम इलेव्हनवर मात : रोहित फ्लॉप, शुभमन गिल, हर्षित राणा चमकले
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
येथे गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या डे-नाईट सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताकडून शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. तर वॉशिंग्टन सुंदरने 42 धावांची स्फोटक खेळी खेळली. हर्षित राणाने अप्रतिम गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी हा अप्रतिम विजय होता. आता, अॅडलेड येथे दि. 6 ते 10 डिसेंबर दरम्यान उभय संघात दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल.
भारतीय संघ व ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काही नवीन नियमांसह सामना खेळवण्यात आला. जिथे दोन्ही संघांना 46-46 षटकांची फलंदाजी करण्याची संधी मिळाली. जो संघ सर्वाधिक धावा करतो तो जिंकतो. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पीएम इलेव्हन संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांचा संघ 43.2 षटकात 240 धावांवर सर्वबाद झाला. पीएम इलेव्हनकडून सॅम कोन्टासने सर्वाधिक 107 धावांची खेळी साकारली तर इतर फलंदाज मात्र भारताच्या गोलंदाजांसमोर फ्लॉप ठरले. टीम इंडियाकडून हर्षित राणाने शानदार गोलंदाजी करताना 44 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक, भारत विजयी
सराव सामन्यात विराट कोहली व जसप्रीत बुमराह या दोघांनी विश्रांती घेणे पसंत केले. 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. टीम इंडियाने 46 षटके फलंदाजी करत 5 विकेट गमावून 257 धावा केल्या. भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त होती. यामुळे टीम इंडियाला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. दरम्यान, केएल राहुल (27) रिटायर हर्ट झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने जैस्वालसोबत डावाची धुरा सांभाळली. 17 व्या षटकात चार्ली अँडरसनने जैस्वालला (45) धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 3 धावांवर बाद झाला. गिलने मात्र 7 चौकारासह अर्धशतकी खेळी साकारली. अर्धशतकानंतर तोही निवृत्त झाला. नितीश कुमार रे•ाrने 32 चेंडूत 42 तर वॉशिंग्टन सुंदरने 36 चेंडूत नाबाद 42 धावांचे योगदान दिले. जडेजानेही 3 चौकारासह 27 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
पीएम इलेव्हन 43.2 षटकांत सर्वबाद 240 (सॅम कोन्टास 107, जॅक क्लायटॉन 40, हॅनो जेकब्ज 61, हर्षित राणा 4 बळी, आकाशदीप 2 बळी, सिराज, सुंदर व जडेजा प्रत्येकी एक बळी).
भारत 46 षटकांत 5 बाद 257 (जैस्वाल 45, केएल राहुल 27, शुभमन गिल 50, रोहित शर्मा 3, नितीश कुमार रे•ाr 42, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 42, जडेजा 27, चार्ली अँडरसन 2 बळी).