टीम इंडियाचे होणार ग्रँड वेलकम
पंतप्रधानांची भेट अन् मुंबईत निघणार विजयी मिरवणूक
वृत्तसंस्था/ मुंबई
टीम इंडिया बार्बाडोसहून भारतात येण्यासाठी रवाना झाली असून गुरुवारी पहाटे भारतात दाखल होणार आहे. नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि बीसीसीआयचे अधिकारी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. टीम इंडिया बार्बाडोसहून विशेष विमानाने गुरुवारी सकाळी थेट दिल्लीला पोहोचेल. यानंतर भारतीय संघ पीएम मोदींची सकाळी 11 वाजता भेट घेणार असल्याची माहिती आयपीएलचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. याठिकाणी विश्वविजेत्या संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला नमवत वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देश टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, बार्बाडोसमध्ये बेरिल चक्रीवादळामुळे खेळाडूंना परतता येत नव्हते. संघातील खेळाडू 3 दिवस अडकून पडले होते. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. संपूर्ण संघ आज पहाटे नवी दिल्लीत दाखल होणार आहे. कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. गुरुवारी पहाटे भारतीय खेळाडू नवी दिल्लीत दाखल होतील. सकाळी 11 वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारताचे खेळाडू मुंबईला रवाना होतील.
रोहितने चाहत्यांसाठी एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहितने आम्हाला हा खास क्षण तुमच्याबरोबर साजरा करायचा आहे, तर आपण एकत्र येऊन हा आनंद साजरा करुया. त्यासाठी भेटूया 4 जुलैला. नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम, संध्याकाळी 5.00 वाजता. चाहत्यांना आपल्याबरोबर सेलिब्रेशन करण्यासाठी रोहितने ट्विट करत बोलावले आहे. विजयी मिरवणूक संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी निघणार आहे. यानंतर भारतीय खेळाडू वानखेडे स्टेडियमवर दाखल होतील आणि तिथे भव्य असा सोहळा पार पडणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.