For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा विंडीजला व्हाईटवॉश

06:56 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा विंडीजला व्हाईटवॉश
Advertisement

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली जिंकली पहिली मालिका : कुलदीप यादव सामनावीर तर रविंद्र जडेजा मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका विजय मिळवला. पहिल्या कसोटीत डावाने पराभूत होणाऱ्या विंडीजने दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला चांगलीच टक्कर दिली. पण, भारतीय संघाने जबरदस्त आत्मविश्वासाने दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत पाहुण्या संघाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली.

Advertisement

दिल्ली कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात तब्बल 518 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात विंडीजच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांचा पहिला डाव केवळ 248 धावांवर गडगडला आणि त्यांना फॉलोऑन मिळाला. फॉलोऑननंतर खेळताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात लढाऊ वृत्ती दाखवली. सलामीवीर जॉन कॅम्पबेलने 199 चेंडूंमध्ये 115 धावा तर शाय होपने देखील उत्तम खेळी करत 214 चेंडूंवर 103 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्ह्स (नाबाद 50), कर्णधार रोस्टन चेस (40) आणि जेडन सील्स (32) यांनीही उपयुक्त खेळी केल्यामुळे वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर आटोपला आणि टीम इंडियाला विजयासाठी 121 धावांचे टार्गेट मिळाले.

सोपे लक्ष्य सहज पार

विंडीजने विजयासाठी दिलेले 121 धावांचे सोपे लक्ष्य टीम इंडियाने पाचव्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार करत दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात 121 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर यशस्वी जैस्वाल फक्त 8 धावा करून बाद झाला. पण, जैस्वाल बाद झाल्यानंतर के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. चौथ्या दिवशी भारतीय संघाने 1 गडी गमावत 63 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुनच भारतीय संघाने पाचव्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. साई सुदर्शन 39 तर कर्णधार गिल 13 धावा करुन बाद झाले. यानंतर केएलने ध्रुव जुरेलला सोबतीला घेत संघाला विजय मिळवून दिला. केएलने नाबाद अर्धशतकी खेळी साकारताना 108 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 58 धावांचे योगदान दिले. जुरेल 6 धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून रोस्टन चेसने 2 तर वॉरिकनने 1 बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 5 बाद 518 घोषित

वेस्ट इंडिज पहिला डाव सर्वबाद 248

वेस्ट इंडिज दुसरा डाव 118.5 षटकांत सर्वबाद 390 (जॉन कॅम्पबेल 115, शाय होप 103, रोस्टन चेस 40, जस्टीन ग्रेव्हज नाबाद 50, जेडन सील्स 32, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह प्रत्येकी 3 बळी, मोहम्मद सिराज 2 बळी, जडेजा आणि सुंदर प्रत्येकी 1 बळी)

भारत दुसरा डाव 35.2 षटकांत 3 बाद 124 (यशस्वी जैस्वाल 8, केएल राहुल नाबाद 58, साई सुदर्शन 39, शुभमन गिल 13, ध्रुव जुरेल नाबाद6, वॉरिकन 1 बळी, रोस्टन चेस 2 बळी).

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी

दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. या शानदार विजयासह भारताच्या खात्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 2025-27 साठी आणखी 12 गुणांची भर पडली आहे. आता भारतीय संघाचे गुण 40 वरून 52 झाले आहेत. पण या विजयानंतरही भारत तिसऱ्या स्थानावर कायम असून विजयाची टक्केवारी 61.90 टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया 100 टक्के पॉइंट टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकन संघ दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, इंग्लंडचा संघ चौथ्या तर बांगलादेशचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पराभवामुळे विंडीजचा पाय आणखी खोलात गेला आहे. विंडीजला आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 भारताचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी एक मोठी सन्मानाची बाब आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला समजून घेणे, त्यांना साथ देणे आणि संघाचे नेतृत्व करणे हे अभिमानास्पद आहे. मी नेहमी परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळा धाडसी निर्णय घ्यावे लागतात. अर्थात, या विजयाचे श्रेय सर्वांचे आहे.

शुभमन गिल, भारतीय कर्णधार

विंडीजविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे आणि तो घरी घेऊन जाणे आनंददायी आहे. तथापि, मी रेकॉर्डबद्दल जास्त विचार करत नाही, माझे लक्ष फक्त संघात योगदान देण्यावर आहे.

मालिकावीर, रविंद्र जडेजा

 विंडीजविरुद्ध सलग 10 वा मालिकाविजय

भारतीय संघाने 2002 पासून वेस्ट इंडिजविरूद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 2002 पासून 2025 पर्यंत भारताने लागोपाठ 10 कसोटी मालिका आपल्या नावे केल्या आहेत. जो एक मोठा विक्रम आहे आणि हा रेकॉर्ड कायम ठेवत भारताने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला.

कुलदीप यादव सामनावीर तर रविंद्र जडेजा मालिकावीर

विंडीजविरुद्ध दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने अहमदाबाद कसोटीत शतक झळकावले आणि दोन्ही कसोटींमध्ये एकत्रितपणे आठ विकेट्स घेतल्या. याशिवाय, दिल्ली कसोटीत दोन्ही डावात 8 बळी घेणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement
Tags :

.