नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर
फेब्रुवारीपर्यंत भारतीय संघाचे भरगच्च वेळापत्रक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी 2024-25 वर्षातील भारतीय संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. टीम इंडिया टी 20 वर्ल्डकपनंतर झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यातच बीसीसीआयने टीम इंडियाचा आणखी एक दौरा निश्चित केला आहे. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. 8 ते 15 नोव्हेंबरमध्ये या कालावधीत उभय संघात चार सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय व आफ्रिका बोर्ड यांनी शुक्रवारी संयुक्त निवेदनात याची घोषणा केली.
टी 20 वर्ल्डकपनंतर 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने अद्याप जाहीर केलेले नाही. पण या आयसीसी स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट संघ एकामागोमाग एक क्रिकेट मालिका खेळणार आहे. यातच आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सहमतीने यांचा वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होईल. टीम इंडिया एका आठवड्यात चार टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, आफ्रिका दौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. यामुळे युवा भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
भारताच्या आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली टी 20 - 8 नोव्हेंबर, डर्बन
दुसरी टी 20 - 10 नोव्हेंबर, पोर्ट एलिझाबेथ
तिसरी टी 20 - 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथी टी 20 - 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग