पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव
दुसऱ्या टेस्टमध्ये कांगारुंचा 10 गड्यांनी विजय : मालिकेत 1-1 बरोबरी
वृत्तसंस्था/ अॅडलेड
पर्थ कसोटी जिंकून सातव्या आसमानावर पोहोचलेल्या टीम इंडियाला अॅडलेडमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखत टीम इंडियाचा पराभव केला. पहिल्या डावात 157 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या डावात केवळ 175 धावा करता आल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य मिळाले, जे यजमान संघाने सहज गाठले आणि 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ऑसी संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता, उभय संघातील तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवली जाईल.
अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण संपूर्ण संघ पहिल्या डावात केवळ 180 धावांत गारद झाला. तर ट्रेव्हिस हेडच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 337 धावा केल्या व 157 धावांची महत्वपूर्ण अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय संघाला चांगलीच महागात पडली.
रविवारी टीम इंडियाने 5 बाद 128 धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि नितीश कुमार रे•ाr क्रीजवर आले. निकाल आधीच स्पष्ट दिसत होता पण पंत आणि रे•ाr या निकालासाठी ऑस्ट्रेलियाला दीर्घकाळ वाट पाहतील अशी आशा होती. पण दिवसातील पहिल्याच षटकात स्टार्कने पंतला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर कमिन्सने लवकरच रविचंद्रन अश्विन (7) आणि हर्षित राणालाही (0) बाद केले. याचवेळी नितीशने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत काही उत्कृष्ट फटके मारताना संघाचे दीडशतक फलकावर लावले. नितीशने 47 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 42 धावांचे योगदन दिले. नितीशला कमिन्सने आऊट केले अन् थोड्याच वेळात भारतीय संघ केवळ 175 धावांवर ऑलआऊट झाला. बुमराह 2 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 5 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. स्कॉट बोलँडने 3 तर मिचेल स्टार्कने 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
कांगारुंचा सहज विजय
टीम इंडिया 175 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी केवळ 19 धावांचे टार्गेट मिळाले. हे विजयी टार्गेट ऑसी संघाने 3.2 षटकांत पूर्ण करत शानदार विजय मिळवला. मॅकस्विनीने 2 चौकारासह 10 तर उस्मान ख्वाजाने 1 चौकारासह 9 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 180 व दुसरा डाव सर्वबाद 175 (जैस्वाल 24, शुभमन गिल 28, रिषभ पंत 28, नितीश कुमार रे•ाr 42, पॅट कमिन्स 5 बळी तर स्कॉट बोलँड 3 बळी). ऑस्ट्रेलिया पहिला डाव 337 व दुसरा डाव बिनबाद 19.
पराभवानंतर टीम इंडियाला मोठा दणका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण
दुसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या पराभवामुळे भारताची आता पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे, तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी 57.29 वर आली आहे, ज्यामुळे टीम तिसऱ्या स्थानावर आली आहे. अव्वल स्थानावर पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी आता 60.71 झाली आहे. भारताच्या पराभवामुळे द. आफ्रिकेलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. ते 59.26 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आफ्रिकन संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केल्यास ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचतील. इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी हरल्याने न्यूझीलंडच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा संपल्या आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड सध्या पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. 50 गुणांच्या टक्केवारीत श्रीलंका सध्या चौथ्या स्थानावर आहे.
टीम इंडियासाठी फायनलचे समीकरण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर भारतासाठी अंतिम फेरीचा मार्ग निश्चितच अवघड झाला आहे. पण सध्या भारताकडे आणखी 3 कसोटी सामने आहेत, जर संघाने तिन्ही सामने जिंकले तर भारताला जास्तीत जास्त 64.03 टक्के गुण गाठण्याची संधी असेल, या गुणांसह भारत अंतिम फेरीत प्रवेश करु शकेल. दुसरीकडे, फायनलमध्ये जाण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशा अधिक आहेत कारण त्यांचे अजून 5 कसोटी सामने बाकी आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर त्यांना श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
दरम्यान, फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासाठी परिस्थिती इतकी कठीण आहे की, ऑस्ट्रेलियाला 3-1 ने पराभूत केले तरी ते अंतिम फेरीत जाईल हे निश्चित सांगता येणार नाही. कारण, दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आगामी कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केले तर ते गुणतालिकेत टीम इंडियाला मागे टाकतील. अशा स्थितीत आफ्रिकेचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. दुसऱ्या स्थानासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होईल.
पॅट कमिन्स ठरला बुमराहपेक्षा वरचढ
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक फाईव्ह विकेट हॉल घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत आता पॅट कमिन्स अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले. या यादीत कागिसो रबाडा, जोश हेझलवूड आणि टीम साऊथी यांसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. आता पॅट कमिन्स हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. अॅडलेडमध्ये त्यानं 9 व्यांदा ही कामगिरी केली. बुमराह हा दुसरा सर्वाधिक फाईव्ह विकेट हॉल घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 8 वेळा ही कामगिरी केली आहे. रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सातवेळा अशी कामगिरी केली आहे.
पर्थमध्ये आम्हाला हवा होता तो संघ आम्ही नव्हतो, पण येथे चांगली कामगिरी केली. जेव्हा हेड फलंदाजीला आला तेव्हा सामना दोन्ही बाजूने जाऊ शकला असता, पण त्याने खेळाचा मार्ग बदलला. अर्थात, अॅडलेडमधील विजय हा निश्चितच कौतुकास्पद आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार, पॅट कमिन्स
पर्थमध्ये आम्ही जे केले ते विशेष होते. आम्हाला त्याची पुनरावृत्ती करायची होती, पण प्रत्येक कसोटी सामन्याची स्वत?ची आव्हाने असतात. आम्ही ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीची वाट पाहत आहोत. तेथे काही छान आठवणी आहेत. आम्हाला चांगली सुरुवात करून चांगली कामगिरी करायची आहे.
रोहित शर्मा, भारतीय कर्णधार